पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे. प्रामुख्याने विदर्भातील काही भागांत पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकणातही काही भागांत हलका पाऊस होणार आहे.
मोसमी पावसाने २० सप्टेंबरला देशातून माघारीचा प्रवास सुरू केला आहे. उत्तर-पश्चिम राजस्थानसह कच्छ भागातून पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत महाराष्ट्रातून त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाचा परतीचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या भागातून थेट मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून देशाच्या विविध भागांसह महाराष्ट्रात काही भागांत पुढील दोन दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांत काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांत, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, जळगाव, नंदूरबार, धुळे आदी जिल्ह्यांत एक ते दोन दिवस पावसाची शक्यता असून, त्यानंतर काही दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे.