पुणे : राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर थंडीचा कडाकाही अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये देशाच्या बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यताही वर्तविण्यात आल्याने ऐन दिवाळीत थंडीसह पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता आहे.

राज्याच्या बहुतांश भागाला ‘ऑक्टोबर हिट’ला सामोरे जावे लागेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हिवाळयात सरासरीपेक्षा जास्त थंडी पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. मागील काही वर्षांपासून जगभराला तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. प्रशांत महासागरात ‘ला – निना’ प्रणाली सक्रिय झाल्यास देशभरात सरासरीपेक्षा जास्त थंडी पडू शकते. मात्र त्याबाबत नोव्हेंबरच्या सुरुवातीला अधिक अचूकपणे सांगता येईल, असे ते म्हणाले. ऑक्टोबर महिन्यात देशात सरासरी ७५.४ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा ११५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसह उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे डॉ. महापात्रा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

मुंबईत उन्हाच्या झळा 

मुंबई : उत्तर भारतातील काही भागांतून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काही दिवसांतच महाराष्ट्रातूनही मोसमी वारे माघारी परतण्यास सुरुवात होईल. दरम्यान, मुंबईत गेल्या आठवडयात मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर मुंबईतील तापमानात वाढ होऊ लागली आहे.

परतीच्या पावसाचा प्रवास सुरू

मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. २३ सप्टेंबरपासून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होऊन २४ सप्टेंबर रोजी थांबला होता. आता दोन ऑक्टोबर रोजी लेह, लडाख, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्ली, हिमाचल प्रदेशातून मोसमी पाऊस पूर्णपणे आणि राजस्थानच्या काही भागातून मोसमी पाऊस माघारी परतला आहे. मुंबई, पुण्यातून १० ऑक्टोबर दरम्यान मोसमी पाऊस  माघारी परतण्याचा अंदाज आहे.