पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून (२४ सप्टेंबर) पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही पावसाची हजेरी राहणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी (२४ सप्टेंबर) बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान विषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे.

हेही वाचा >>> केंद्र सरकारचा आदेश खाद्यतेल कंपन्यांनी धुडकावला ? जाणून घ्या, ग्राहकांवर काय परिणाम होणार

बंगालच्या उपसागरावरून येणारी बाष्पयुक्त हवा आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त हवेचा मिलाफ किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर होऊन संपूर्ण किनारपट्टी आणि पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि किनारपट्टीवर पावसाचा जोर राहील. राज्याच्या उर्वरित भागातही पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा >>> कंत्राटी शिक्षक नियुक्तीमध्ये महत्त्वाचा बदल… शिक्षण विभागाचा नवा निर्णय काय?

मंगळवारसाठी पावसाचा अंदाज

नारंगी इशारा – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली

पिवळा इशारा – उर्वरित महाराष्ट्र.

मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू

वायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सोमवारपासून (२३ सप्टेंबर) सुरू झाला आहे. यंदा सलग १४ व्या वर्षी परतीचा प्रवास विलंबाने सुरू झाला. सामान्यपणे १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू झाला. गेल्या वर्षी २५ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू झाला होता. यंदा परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला आहे. शिवाय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीच्या प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळण्याचा अंदाज आहे.