पुणे : नोव्हेंबर महिन्यात सातत्याने हवामानात चढ-उतार झाले असताना डिसेंबरमध्ये मात्र राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीखाली राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नाताळ आणि वर्षअखेरीस कडाक्याच्या थंडीचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय हवामान विभागाने डिसेंबरमधील दीर्घकालीन अंदाज नुकताच जाहीर केला. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तरेरकडील काही भाग, हिमालयीन विभाग, दक्षिणेकडील काही राज्यांसह महाराष्ट्रातील तापमान अधिक थंड राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिल्या टप्प्यात आणि पंधरवडय़ानंतरच्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडी जाणवली. नोव्हेंबरच्या २० ते २२ तारखांच्या कालावधीत राज्यातील सर्वच भागात तापमानात मोठी घट झाली होती. बहुतांश ठिकाणी १० अंशांखाली तापमान गेल्याने थंडीचा कडाका जाणवला. हा कालावधी वगळता इतर वेळेला मात्र तापमानात सातत्याने बदल दिसून आले. सध्या ईशान्य मोसमी पावसाचा कालावधी आहे. दक्षिणेकडे सक्रिय असलेल्या या पावसाचा वेळोवेळी महाराष्ट्रावर परिणाम जाणवला आहे.

बहुतांश वेळी बंगालच्या उपसागरात आणि काही वेळेला अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले. त्यामुळे दक्षिणेकडील तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी भागांत पाऊस झाला. त्याचा परिणाम महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली.

डिसेंबरमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत तापमानातील मोठय़ा प्रमाणावरील चढ-उतार कमी होणार आहेत. या महिन्यामध्ये कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वच भागात रात्रीचे किमान तापमान बहुतांश दिवशी सरासरीखाली राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमानातील घट अधिक काळ राहण्याची शक्यता आहे. मध्य भारत, देशाच्या उत्तर-पश्चिम भागात अनेक ठिकाणी तापमानात डिसेंबरमध्ये मोठी घट राहण्याची शक्यता आहे. पूर्वोत्तर भागामध्ये मात्र तापमान सरासरीपेक्षा काही प्रमाणात अधिक असेल.

हलका गारवा कायम

’राज्यात सध्या विदर्भ, मराठवाडा, कोकणात सर्वच ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते ३ अंशांनी कमी आहे.

’औरंगाबाद येथे शुक्रवारी राज्यातील नीचांकी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईसह सर्वच कोकण विभागात किमान तापमान सरासरीइतके राहिले.

’विदर्भात सर्वत्र तापमानात सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंशांची घट आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, जळगाव वगळता इतरत्र तापमान सरासरीच्या पुढे आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd predicted minimum temperature will be below average in most of maharashtra places in december zws