पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात आज, ५ जून रोजी काही ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ामध्ये काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.
मोसमी वाऱ्यांचे आगमन लांबणीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पाच जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, केरळमधील पावसाचे आगमन लांबले आहे. मोसमी वाऱ्याची आगेकूच सुरू असून, अद्याप हे वारे केरळध्ये पोहोचलेले नाहीत. रविवारी मोसमी वाऱ्याने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आगेकूच केली.