पुणे : मोसमी पावसासाठी पोषक वातावरण आहे. पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होईल. जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील एल-निनो तटस्थ अवस्थेत गेला आहे, तर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत ला – निना स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. तर हिंदी महासागरातील द्वि धुव्रिता सध्या तटस्थ आहे. मोसमी पावसासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. जुलै महिन्यात देशात सरासरी २८०.४ तर राज्यात सरासरी ३६२.३ मिमी पाऊस पडतो, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> विक्रमी प्रवासी संख्येसह मेट्रो सुसाट! पालख्यांच्या आगमनामुळे ३० जूनला दुपटीने वाढून दोन लाखांवर पोहोचली

राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात काहीसा कमी पण, सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यांत देशासह राज्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि पंजाबचा वायव्य भाग वगळता सोमवारपर्यंत (१ जुलै) मोसमी पावसाने देशाचा सर्व भाग व्यापला आहे. पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरीत भागात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> एक रुपयात पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी १०० ते २५० रुपयांची मागणी; ई-सेवा केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट?

जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

जून महिन्यात दक्षिण भारताचा अपवाद वगळता देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जूनमध्ये देशात सरासरी १६५.३ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १०.९ टक्के कमी म्हणजे १४७.२ मिमी पाऊस झाला. दक्षिण भारतात सरासरी १६१ मिमी पाऊस पडतो, तिथे १४.२ टक्के अधिक, १८३.९ मिमी पाऊस झाला आहे. वायव्य भारतात सरासरी ७८.१ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ३२.६ टक्के कमी, ५२.६ मिमी पाऊस झाला. ईशान्य भारतात ३२८.४ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १३.३ टक्के कमी, २८४.९ मिमी पाऊस पडला. मध्य भारतात १७०.३ मिमी सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १३.७ टक्के कमी, १४७ मिमी पाऊस पडला आहे.

Story img Loader