पुणे : मोसमी वाऱ्याचा मागील दोन दिवसांपासून जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जातील. याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. किनारपट्टीवर मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीला ‘ऑरेंज अॅलर्ट’
हवामान विभागाने १७ जुलै रोजी रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला आणि १८ जुलै रोजी रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ‘ऑरेंज अॅलर्ट’ दिला आहे. या काळात बहुतेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
कुलाब्यात सर्वाधिक पाऊस
मुंबईसह किनारपट्टीवर शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या नऊ तासांत कुलाब्यात ३८ मिमी, सांताक्रुझमध्ये ३०, अमरावतीत २८, नागपूर, रत्नागिरीत १७, महाबळेश्वर १४, अलिबागमध्ये १४, चंद्रपुरात ८, वर्ध्यात ७, डहाणूत २, नाशिक, नांदेड २ आणि सोलापुरात ३ मिमी पाऊस झाला.