पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यावर पुन्हा अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. शनिवारपासून पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या एक पश्चिमी विक्षोप (थंड हवेचा झंझावात) हिमालयीन परिसरात सक्रिय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उसाला आजवरची उच्चांकी एफआरपी मिळणार ? जाणून पंतप्रधान मोदींनी कारखान्यांना काय आदेश दिले

शनिवारी, २४ फेब्रुवारीला आणखी एक पश्चिम विक्षोप सक्रिय होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, एक कमी दाबाची रेषा मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत सक्रिय आहे. या हवामानविषयक स्थितीचा परिणाम म्हणून मराठवाड्यात रविवार, २५ फेब्रुवारी ते मंगळवार, २७ फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाचा काहीसा जोर राहण्याचा अंदाज आहे. शनिवारपासून पुढील पाच दिवस हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

किमान तापमानात घट शक्य

उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd predicts light to moderate rainfall in vidarbha and marathwada pune print news dbj 20 zws