पुणे : मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बुधवारी (५ जून) मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात मोसमी पाऊस गोव्यातच अडखळला आहे. गुरुवारी( ६ जून) तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून (८ जून) पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पाऊस मंगळवारी (४ जून) गोव्यात दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे बुधवारी (५ मे) तळकोकणात पाऊस दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात पाऊस गोव्यातच अडखलला आहे. सिंधुदुर्गमध्ये बुधवारी ढगाळ वातावरण तयार झाले होते. तापमानात घटही झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. पण, तो पूर्वमोसमी होता. गुरुवारी (६ जून) मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : साखरपट्ट्यात महाविकास आघाडी सरस; महायुती काठावर उत्तीर्ण, भाजपाला जोरदार फटका
मुंबईसह किनारपट्टी, घाट परिसरात कोसळधारा
हवामान विभागाने शनिवारी (८ जून) आणि रविवारी (९ जून) रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या अन्य भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी रविवारपासून पुढील दोन दिवस मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह पश्चिम घाटात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सोमवारपर्यंत (१० जून) मोसमी पाऊस विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यभरात दाखल होईल. रविवार, सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह किनारपट्टी आणि पश्चिम घाटात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर राहणार आहे.
डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त शास्त्रज्ञ, हवामान विभाग.