राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने निर्मिती केलेल्या ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर झालेला अन्याय त्वरित दूर करावा, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याच्या शिक्षण संचालकांकडे केली आहे.
या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये मराठे आणि रजपूत यांच्या पराक्रमाचा इतिहास केवळ दोन पानांमध्येच आहे. छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीतील एकाचेही चित्र नाही. छत्रपती संभाजीमहाराज, राजाराममहाराज, महाराणी ताराबाई, संताजी-धनाजी, बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, रघुनाथराव, सदाशिवरावभाऊ, मल्हारराव होळकर, अहल्याबाई होळकर, दत्ताजी शिंदे, खंडेराव दाभाडे, रघुजी भोसले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, राजर्षी शाहूमहाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिवीर उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरू, न्या. महादेव गोविद रानडे, लोकहितवादी, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कर्तृत्वाचा या पुस्तकामध्ये उल्लेखही नसल्याची बाब इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर आणि पांडुरंग बलकवडे यांनी निदर्शनास आणून दिली आहे. या बाबीची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिक्षण मंडळ सदस्य शिरीष फडतरे यांनी केली आहे.

Story img Loader