पिंपरी-चिंचवड शहरातील विसर्जन मिरवणुकांना वादंगाचे गालबोट लागले. भोसरीत आमदार विलास लांडे व स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक एकमेकांशी भिडले, तर खराळवाडीत फटाके वाजवण्याच्या मुद्दय़ांवरून दोन गटात हाणामारी झाली, त्यातून नगरसेवकाच्या कार्यालयावर दगडफेक झाली. त्याचप्रमाणे, पोलीस व मंडळांचे कार्यकर्ते यांच्यात अनेक ठिकाणी खटके उडाले.
अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी भोसरीतील मंडळांचे विसर्जन होते. मंडळे पुढे नेण्याच्या मुद्दय़ावरून लांडे व लांडगे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादंग झाले. कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने व दोन्हीकडील वरिष्ठ मंडळींनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने पुढील प्रकार टळला. पिंपरी खराळवाडीत फटाके वाजवण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या वेळी एका नगरसेवकाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. नंतर, हे प्रकरण मिटवण्यात आले. सोमवारी चिंचवडला एका वाहतूक विभागाच्या पोलिसाला एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याने मारहाण केली. पिंपरीत मंडळाचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादावादी झाल्यानंतर एका माजी उपमहापौराने पोलिसाला शिवीगाळ केली, तथापि, दोन्ही बाजूने प्रकरण मिटवण्यात आल्याचे समजते. रात्री बारा वाजल्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. वाद्य वाजवणाऱ्या मंडळांना पोलिसांनी अटकाव केला. बारानंतर येणाऱ्या मंडळांच्या मिरवणुका शांततेत आणण्यास पोलिसांनी भाग पाडले. त्यावरून मंडळे व पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. मात्र, पोलिसांनी कोणाचे ऐकून न घेता नियमानुसार कार्यवाही केली.