राज्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि पाणीटंचाई ध्यानात घेऊन मानाच्या गणपती मंडळांनी महापालिकेने उभारलेल्या हौदातील पाण्यामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२३ वर्षांच्या इतिहासामध्ये मानाच्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी प्रथमच हा नवा पायंडा पाडला आहे. जलतत्त्वामध्ये पार्थिव गणेशाचे विसर्जन करावे असे धर्मशास्त्राने सांगितल्यानुसार हे विसर्जन होत असल्याचेही मानाच्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मानाच्या गणपती मंडळांच्या या निर्णयाचे शहरातील अनेक मंडळे अनुकरण करतील, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.
पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळाच्या साक्षीने या निर्णयाची घोषणा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी केली. महापौर दत्ता धनकवडे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, कार्याध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विवेक खटावकर, नितीन पंडित, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने आणि कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी या वेळी उपस्थित होते. केसरीवाडा ट्रस्टचे रोहित टिळक, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे बाबा डफळ आणि अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी या निर्णयाचे पालन करणार असल्याचे सांगितले.
दुष्काळ आणि पाणीटंचाई ही सध्याची परिस्थिती ध्यानात घेऊन हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगून श्रीकांत शेटे म्हणाले, या संदर्भात आम्ही पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून मंडळांचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे महापौर दत्ता धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांच्याशीही बोलणे झाले आहे.
पुणे स्मार्ट सिटी होत असताना मानाच्या मंडळांनी हा स्मार्ट निर्णय घेतला असल्याची भावना दत्ता धनकवडे यांनी व्यक्त केली. आता बाकीची मंडळे मानाच्या गणपतींच्या निर्णयाचे अनुकरण करतील. त्याचप्रमाणे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन करू नये, असे आवाहन नागरिकांना मी या निमित्ताने करतो, असेही धनकवडे यांनी सांगितले.
नदीचे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशातून हा निर्णय घेतला आहे का, असे विचारले असता शेटे म्हणाले, शाडूच्या मूर्ती विसर्जनाने नदीचे प्रदूषण होत नाही असा एक प्रवाह आहे. मानाच्या गणपतीची मूर्ती ही शाडूचीच आहे. त्यामुळे समाजाचे भान ठेवून समाजाचा हा उत्सव साजरा करताना धर्मशास्त्राला आड येणारा निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पुरोगामी आणि प्रगल्भ विचार करण्याची तयारी आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना आम्ही धर्मशास्त्राने सांगितल्यानुसार जलतत्त्वामध्ये विसर्जन करीत आहोत.
नदीमधील अस्वच्छ पाण्यामध्ये की हौदातील स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करायचे हा मुद्दा आहे. त्यामुळे स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करायचे हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला असल्याचे महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

‘धरणातील पाणी वाया जाणार नाही’
हौदामध्ये विसर्जन करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता विसर्जनासाठी धरणातून पाणीसाठा सोडू नये असे आवाहन पालकमंत्र्यांना करणार का, असे विचारले असता श्रीकांत शेटे म्हणाले, हा निर्णय प्रशासनाने घ्यावयाचा आहे. मात्र, धरणातून सोडलेले पाणी मुंढवा येथे अडविण्यात येणार असून ते पाणी शेतीला देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले तरी ते वाया जाणार नाही. त्याचप्रमाणे शहरातील ३०० गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी धरणातील गाळ काढण्याचे काम केले असल्याने धरणातील पाणीसाठय़ामध्ये मोठी वाढ झाली आहे ही बाब ध्यानात घेतली पाहिजे.

Story img Loader