माहिती अधिकाराच्या कायद्याचा पत्रकारितेमध्ये प्रभावी वापर झाला पाहिजे. किंबहुना पत्रकारितेच्या शिक्षणापासूनच या गोष्टी शिकविल्या गेल्या पाहिजेत, असे विचार ‘द हिंदू’ चे मुख्य माजी संपादक एन राम यांनी व्यक्त केले.
प्रकाश कर्दळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यानामध्ये ‘ब्रेकिंग न्यूज; मेकिंग न्यूज’ या विषयावर एन. राम यांचे व्याख्यान झाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे माजी संपादक दिलीप पाडगावकर अध्यक्षस्थानी होते. प्रकाश कर्दळे मित्र परिवाराचे आनंद आगाशे, विनिता देशमुख त्या वेळी उपस्थित होते.
एन राम म्हणाले की, बोफोर्स प्रकरणाच्या वेळची माध्यमे व आताच्या माध्यमांची तुलना केली, तर शोधपत्रकारिता कमी झाल्याचे चित्र आहे. आजच्या पत्रकाराला शोध पत्रकारितेसाठी आवश्यक तितका वेळही दिला जात नाही. अशा पत्रकारितेसाठी पुरेसा वेळ देऊ शकेल तो एक चांगला संपादक असतो. काही प्रकरणामध्ये ‘स्टींग ऑपरेशन’ केले जाते, पण त्यामुळे शोधपत्रकारिता काही वेळा मागे पडते, असे वाटते. सध्या वर्तमानपत्राच्या वाचकांमध्ये ०.५ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. जगातील माध्यमांचा विचार केला, तर भारतातील वर्तमानपत्रांचा व्यवसाय फारसा अडचणीत नाही. पण, पत्रकारिता तितकी चांगली आहे का, हा प्रश्न आहे. वर्तमानपत्राचा व्यवसाय जाहिरातींवर अवलंबून असल्याने त्यातून पत्रकारितेवर काही मर्यादा येतात, हेही खरे आहे. आदर्शवाद घेऊन या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांचा काही वेळा भ्रमनिरासही होतो.
माध्यमांना उद्देशून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की, प्रत्येक बाबतीमध्ये टीकेचे धोरण घेऊन देशात निराशावाद तयार करू नका, असे मनमोहन सिंग म्हणाले. मात्र, भ्रष्ट व्यवस्थेला विरोध झालाच पाहिजे. त्यासाठी शोधपत्रकारिता व टीका ही झालीच पाहिजे. पण, माध्यमांवर होणारी टीकाही गैरलागू नाही. काही महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला जात नाही. लोकांना शिक्षित करणे हाही एक महत्त्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठही निर्माण झाले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी, तर प्रास्ताविक विनिता देशमुख यांनी केले.

Story img Loader