पुणे : केद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. पामतेलाची ३४ टक्क्यांनी, सोयाबीन तेलाची १५ टक्क्यांनी आणि सूर्यफूल तेलाची ४९ टक्क्यांनी घटली आहे.

खाद्यतेलाचे आयातदारांच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने या बाबतचे वृत्त दिले आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये पामतेलाची आयात ३४ टक्क्यांनी घटली आहे. ऑगस्टमध्ये ५.३० लाख टन तेलाची आयात झाली होती. पामतेलाची आयात गेल्या सहा महिन्यांतील सर्वात कमी आयात ठरली आहे. पामतेलासह सप्टेंबरमध्ये सोयाबीन तेलाची आयात १५ टक्क्यांनी घटली असून, ३.८८ लाख टनांची आयात झाली आहे. सूर्यफूल तेलाच्या आयातीला मोठा फटका बसला असून, ४९ टक्क्यांनी आयात कमी झाली आहे. ही गेल्या दहा महिन्यांतील नीचांकी आयात ठरली आहे. सप्टेंबरमध्ये केवळ १.४५ लाख टन आयात झाली आहे.

हे ही वाचा…आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ३९०० कोटी जाणून घ्या, कोणत्या योजनेचे किती पैसे मिळणार

केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविल्यामुळे आणि इंडोनेशिया, मलेशियाने वाढवलेल्या निर्यात शुल्कामुळे पामतेलाची आयातीचा दर जवळपास सोयाबीन आणि सूर्यफूल तेला इतकाच झाला आहे. त्यामुळे खाद्यतेल कंपन्यांनी शुद्ध आणि कच्च्या पामतेलाची आयात जवळपास बंद केली आहे. तर आयात शुल्क लागू करण्यापूर्वी कमी दराने आयात झालेला सुमारे ३० लाख टन तेलाचा साठा शिल्लक असल्यामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयातही कमी झाली आहे, अशी माहिती सनविन समुहाचे कार्यकारी प्रमुख संदीप बजोरिया यांनी दिली. वाढलेल्या दरामुळे आयातदारांनी, अनेक खाद्यतेल कंपन्यांनी पामतेल आयात रद्द केली आहे किंवा पुढे ढकलली आहे. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आवस्था यापेक्षा वेगळी नाही.

हे ही वाचा…एकविरा गडावर किती आले, दर्शन घेतले आणि गेले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

पामतेलाच्या दरात घट झाल्यानंतरच पामतेल आयातीला गती मिळण्याची शक्यता आहे. तर सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाची आयात हळूहळू वाढले. आयातदार तेलाचा साठा करून ठेवण्याच्या मनस्थितीत नाहीत. जितके तेल लागते तितकेच आयात करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात आयातीत काहिशी वाढ होण्याचा अंदाज आहे. पण, देशात सुमारे ३० लाख टनांचा साठा असल्यामुळे दिवाळीत टंचाई भासण्याची कोणतीही शक्यता नाही. भारत पामतेल इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून आयात करतो. तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेल अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून आयात करतो.