पुणे : पंढपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या योजना संचालनालयातर्फे केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानाबाबत वारी साक्षरतेची या उपक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करत निरक्षरांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच वारी संपल्यानंतर नोंदणी केलेल्या निरक्षरांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी ही माहिती दिली. केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२ ते २०२७ या कालावधीत वय वर्ष १५ आणि त्यापुढील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा २०२४ मध्ये या अभियानाविषयी प्रचार-प्रसार आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या मार्गांवर करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी दोन्ही संस्थानाचे सहकार्य घेतले जात आहे. त्याबाबत पालखी सोहळा प्रमुखांशी विचारविनिमय करून नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी ‘उल्लास’ कार्यक्रमाची माहिती दर्शवलेल्या मिनी बससमवेत शिक्षक, स्वयंसेवकांचे पथक असणार आहे.
पालखी मार्गावर साक्षरतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या पथनाट्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच बारामती, इंदापूर, सासवड, लोणंद येथील मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळ्यातील निरक्षरांची नोंदणी शाळांच्या मदतीने केली जाणार आहे. या शिवाय महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरकडे निघणाऱ्या पालखी सोहळा मार्गावरील गावांमध्येही असे उपक्रम घेण्याबाबतच्या सूचना संचालनालयाने दिल्या आहेत. वारीमध्ये नोंदणी केलेले वारकरी वारी संपल्यावर मूळ गावी गेल्यानंतर त्यांना त्यांच्या लगतच्या शाळेशी संपर्क साधून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याबाबत सांगितले जाईल. तसेच त्यांना स्वयंसेवकांबरोबर जोडून देऊन त्यांचे शिक्षण सुरू होईल. येत्या सप्टेंबर किंवा मार्चमध्ये होणारी पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान चाचणी परीक्षा त्यांना देता येईल. परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.