पुणे : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बुधवारी पहाटे चारच्या सुमारास खराडीत पोहोचली. खराडीतून जरांगे पाटील सकाळी लोणावळ्याकडे मार्गस्थ होणार आहेत. पदयात्रेत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळपासून नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. नगर रस्ता, येरवडा, जहाँगीर चौक, संचेती चौक, गणेशखिंड रस्ता, ओैंध, सांगवी, डांगे चौकमार्गे पदयात्रा लोणावळ्याकडे जाणार आहे.
अहमदनगरहून पुणे शहराकडे येणारी वाहतूक शिक्रापूर येथून चाकण, भोसरीमार्गे वळविण्यात येणार आहे. लोणीकंद, थेऊर फाटा, केसनंद, थेऊर ते सोलापूर रस्ता, वाघोली आव्हाळवाडी, मांजरी, केशवनगर, मुंढवामार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी पोहचावे. नगरहून पुणे शहराकडे येणारी वाहतूक वाघेश्वर मंदिरापासून बंद करण्यात येणार आहे. पदयात्रा मार्गस्थ झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बाेराटे यांनी कळविले आहे.
पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपास चौकातून मगरपट्टा चौकात जावे. तेथून सोलापूर रस्तामार्गे थेऊर फाटा केसनंद ते लोणीकंद रस्त्याने वाहनचालकांनी नगर रस्त्यावर यावे. खडकीतील होळकर पूल आणि येरवड्यातील सादलबाबा चौकातून येणाऱ्या वाहनचालकांनी चंद्रमा चौक, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जावे.
येरवड्यातील डाॅ. आंबेडकर सेतूकडे जाणारी वाहतूक आवश्यकता भासल्यास कोरेगाव पार्क चौकातून वळविण्यात येईल, तसेच बंडगार्डन रस्त्यावरील मोबोज चौकातून डाॅ. आंबेडकर सेतूकडे जाणारी वाहतूक आवश्यकता भासल्यास कोरेगाव पार्क चाैकाकडे वळविण्यात येणार आहे. पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चौक, जहांगीर चौकातून नगर रस्त्याकडे जाणारी वाहतूक आवश्यकता भासल्यास वळविण्यात येईल.
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक, प्रादेशिक परिवहन चाैकातील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. खडकीतील पोल्ट्री फार्म चौकातून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक होळकर पुलाकडे वळविण्यात येईल. मुळा रस्ता चौक, पाटील इस्टेट चौक, येथील वाहतूक वळविण्यात येईल. जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे भुयारी मार्ग, वेधशाळा चौक, चापेकर चौक, वाकडेवाडी, नर्गीस दत्त रोड, सूर्यमुखी दत्त मंदिर चौक, संगान्ना धोत्रे पथ, सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल.
हेही वाचा : मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यात दाखल; समाजबांधवांना आवाहन करत म्हणाले…
ओैंध आणि बाणेर रस्त्यावरून शिवाजीनगरकडे येणारी वाहतूक गरज भासल्यास वळविण्यात येईल. महाबळेश्वर हॉटेल, बाणेर-पाषाण लिंक रस्ता मार्गे सूस रस्ता, शिवाजी चौक, पाषाणमार्गे किंवा सूस खिंडमार्गे चांदणी चौक कोथरूड ते पुणे शहर अशी वाहतूक वळविण्यात येईल. बाणेर परिसरामधील वाहतूक अभिमानश्री सोसायटी चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, पाषाणमधील शिवाजी चौक, चांदणी चौक, कोथरूडमार्गे पुणे शहरकडे वळविण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सांगवीकडे जाणारी वाहने आवश्यकतेनुसार पाषाण, बाणेरकडे वळविण्यात येतील. ओैंधमधील ब्रेमन चौकातून येणारी वाहने हॅरीस पूलमार्गे पिंपरी-चिंचवडकडे सोडण्यात येतील.