लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरातील प्रदूषणात वाढ झाल्याने ते नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत अति रहदारीच्या ठिकाणी कारंजे उभारण्याचे नियोजित असून पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी कारंजे उभारण्यात येणार आहेत. कारंज्यांमुळे धूळ नियंत्रणात राहील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमधील प्रदूषणाची पातळी वाढली असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या ढासळत्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करताना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका प्रशासनाकडूनही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा-खडकवासला धरण ते फुरसुंगी कालवा होणार बंद… जाणून घ्या या जागेचा वापर आता कशासाठी होणार?
शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणात आहे. अन्य शहरांच्या तुलनेत हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचलेली नाही. मात्र, दक्षतेचा उपाय म्हणून शहरातील २० ठिकाणी कारंजे बसविण्याचे नियोजित आहे. संचेती चौक, जंगली महाराज रस्ता, येरवडा चौक, लोकमान्य टिळक चौक, शनिवारवाडा चौक आणि स्वारगेट चौक या प्रमुख चौकांचा यामध्ये समावेश असून, हे सर्व चौक अति रहदारीचे आहेत. यामुळे धुलिकण जमिनीवर स्थिर होण्यास मदत होणार आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. रहदारीच्या चौकांचा अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी नैसर्गिक इंधनावरील (सीएनजी) आणि वीजेवर धावणारी वाहने खरेदीचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या अधिकारी वर्गासाठीही वीजेवर धावणाऱ्या गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. तर रिक्षांचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्यासाठी महापालिकेकडून प्रोत्साहन निधी दिला जात आहे.