लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पुरंदर विमानतळ होणार, ते थांबणार नाही. विमानतळाबाबतचा जागा भुसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला आहे. त्याला तत्काळ मान्यता दिली जाईल. त्याचे दर ठरविले जातील. कोणाचेही नुकसान होणार नाही. सर्वांना चांगले दर मिळतील. तसे दर ठरवून जागेचे भुसपादन केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
चिखलीत बोलताना फडणवीस म्हणाले, ‘पुरंदर विमानतळ हे पुण्याच्या विकासाला चार पटीने पुढे नेणार आहे. पुण्याच्या विकासातला मध्यमार्ग हा विमानतळ आहे. लोहगाव विमानतळ विकसित, नविन टर्मिनल केले. परंतु, पुणे ही हवाई दलाची महत्त्वाची सदन कमांड आहे. याठिकाणी देशाच्या सुरक्षिततेसाठी हवाईदलाचे उपक्रम ३६५ दिवस चालवावेच लागतात. त्यासाठी धावपट्टी बंद करून मोठा काळ हवाईदलाला विमानतळ द्यावे लागते. त्यामुळे जोपर्यंत नवीन विमानतळ बांधले जात नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय शहर म्हणून पुण्याची असलेली ख्याती मिळू शकत नाही. त्यासाठी पुरंदर विमानतळ होणे आवश्यक आहे. त्याबाबतचा जागा भुसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला आहे. त्याला तत्काळ मान्यता दिली जाईल’.
‘जागेचे दर ठरविले जातील. कोणाचेही नुकसान होणार नाही. सर्वांना चांगले दर मिळतील. तसे दर ठरवून जागेचे भुसपादन केले जाईल. हे केवळ विमानतळ असणार नाही, तर विमानतळाबरोबरच माल वाहतुकीचे केंद्र असणार आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाला गती मिळेल. आयात आणि निर्यातीकरिता अर्थकारण या विमानतळाच्या माध्यमातून सुरू होईल. तरूणाईच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. भारताच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्रासाठी पुणे जिल्हा अत्यंत महत्वाचा आहे. हा जिल्हा विकासचे इंजिन आहे’, असेही ते म्हणाले.