एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी सखोल तपास केला. त्यात अनेक खुलासे होत आहेत. तपासात राहुल हंडोरेने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीचा खून केल्यानंतर पोलिसांना आपला ठावठिकाणा समजू नये म्हणून केलेले प्रयत्न समोर आले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने याबाबत इंडियन एक्स्प्रेसला घटनाक्रम सांगितला आहे.
पुणे-सांगली-गोवा-चंदीगड-हावडा; मृतदेह आढळल्यानंतर आरोपीचा ठिकठिकाणी प्रवास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल हंडोरेने केवळ पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याने पोलिसांची दिशाभूल व्हावी म्हणून प्रयत्न केले. १८ जूनला दर्शनाचा मृतदेह आढळल्यानंतर राहुल हंडोरेने पुणे सोडलं आणि रेल्वेने प्रवास करण्यास सुरुवात केली. तो आधी सांगलीला गेला. तेथून तो गोव्याला गेला. आरोपी राहुल गोव्यातच थांबला नाही, तर पुढे चंदीगड आणि तेथून पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रयत्न
वरवर पाहता आरोपी राहुलचा हा प्रवास मोघम वाटत असला, तरी तो तसा नव्हता. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रयत्न केले. तो हावड्यावरून मुंबईला आला. या संपूर्ण रेल्वे प्रवासात त्याचा मोबाईल बंद होता.
हेही वाचा : VIDEO: आधी प्रेमसंबंध, नंतर ब्रेक अप, आता दर्शना अधिकारी झाल्यावर लग्नाची मागणी अन् हत्या? पोलीस म्हणाले…
कुटुंबाला आणि मित्रांना पाचवेळा कॉल
आरोपी राहुल हंडोरेने या काळात इतरांकडून फोन घेऊन आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना पाचवेळा कॉल केले. तो प्रवासात स्थानिक लोकांकडे मदतीची विनंती करत कुटुंबाला कॉल करण्यासाठी फोन करायचा. पोलिसांना त्याच्या कुटुंबाकडून या नंबरवरची माहिती मिळाल्यानंतर या नंबरवर पुन्हा कॉल करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि कुटुंबाला कॉल करण्यासाठी फोन मागणाऱ्या राहुल हंडोरेची माहिती दिली.
कुटुंबाला कॉल करून लगेच ठिकाण बदलायचा
या सर्व घटनाक्रमावरून हंडोरे केवळ फरार झाला नाही, तर त्याने पोलिसांना त्याचा माग लागू नये म्हणून प्रयत्न केले. त्याने प्रवासात लोकांकडे अन्न मागून खाल्लं. पोलिसांनी त्याच्या कॉलच्या आधारे तो कुठे आहे हे शोधून तपास पथकं पाठवली असती, तरी ते प्रयत्न अपयशी ठरले असते असा त्याने प्रयत्न केला. कारण तो इतरांच्या फोनवरून कॉल करून लगेच ठिकाण बदलायचा, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : दर्शना अहमदनगरची, तर आरोपी राहुल नाशिकचा; मग दोघांची लहानपणापासून ओळख कशी? पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण
ट्रेकला जाताना आरोपी राहुलने कटर किंवा ब्लेड नेलं?
अखेर आरोपी राहुल हंडोरे मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती समजल्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. तो अंधेरीहून पुण्याला येणार होता. दरम्यान, दर्शना पवारबरोबर ट्रेकला जाताना आरोपी राहुलने कटर किंवा ब्लेड नेलं होतं का याचाही पोलीस तपास करत आहेत.