पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. हा निर्णय राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी राज्यसेवा परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून शिफारस झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारसपात्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येत होते. त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भातील कार्यपद्धत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात मुलाखतीसाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करून वैद्यकीय पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता-अपात्रता विचारात घेऊन शिफारसपात्र उमेदवारांची निवडयादी तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जूनमध्ये घेतला होता.
हेही वाचा – राज्य सरकार केवळ तोंड वाजविणारे, सरकारी धोरणांवर राज ठाकरे यांची टीका
हेही वाचा – कोथिंबीर, मेथी कवडीमोल; घाऊक बाजारात जुडीला २ ते ७ रुपये
या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी विभागीय मंडळांची स्थापना करणे, उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला काही कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे मुलाखतीच्या टप्प्यावर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी २०२३ पासून लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.