पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या प्रमाणात बरीच तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शाळांनी त्यांच्या अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेची पुनर्तपासणी करण्याची सूचना सीबीएसईने केली आहे.
गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. त्या अनुषंगाने सीबीएसईने प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्याद्वारे गेल्यावर्षीच्या निकालाच्या माहितीच्या आधारे केलेल्या पाहणीत सुमारे पाचशे शाळांमध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या काही विषयांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांमध्ये फरक आढळून आला. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
पाहणीत आढळलेल्या फरकामुळे प्रात्यक्षिक परीक्षांचे मूल्यमापन अधिक बारकाईने करण्याची गरज आहे. त्यासाठी शाळांनी अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेची पुनर्तपासणी करण्याची आवश्यकता आहे. अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया वास्तववादी आणि विश्वासार्ह असल्याची, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण भर घालत असल्याची खात्री करण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने आणि अचूक होण्यासाठी या सूचना उपयुक्त ठरतील असे सीबीएसईने नमूद केले आहे.