पुणे : ‘गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत असून, या बदलांचे सकारात्मक परिणाम येत्या काळात दिसतील,’ असा विश्वास गोखले संस्थेचे प्रभारी कुलगुरू डॉ. शंकर दास यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली गोखले संस्था गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आली आहे.

मातृसंस्था भारत सेवक समाजाचे अध्यक्ष दामोदर साहू यांनी कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना हटवून नव्या कुलपतींची नियुक्ती करण्याचा घेतलेला निर्णय, कुलपतींना नियत कालावधीत हटवता येत नसल्याचे कुलगुरूंनी निदर्शनास आणून देणे, त्यानंतर डॉ. सन्याल यांनी दिलेला रोखठोक प्रतिसाद, संस्थेच्या अध्यक्षांनी डॉ. सन्याल यांना कुलपती म्हणून कायम ठेवण्याचे दिलेले पत्र अशा घडामोडी घडल्या. यावर बरीच चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने डॉ. दास यांच्याशी संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतली.

नॅक मूल्यांकनातील घसरणीच्या आरोपांवर डॉ. दास म्हणाले, ‘मी कुलगुरू म्हणून नोव्हेंबर २०२४मध्ये आलो. नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया त्यापूर्वी झाली होती. २०१८ ते २०२३ या काळातील कामगिरीवर आधारित मूल्यांकनामध्ये घसरण झाली, याचा अर्थ पूर्वी चांगले काम झालेले नाही. मात्र, आता असे होणार नाही. गोखले संस्थेमध्ये पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात नव्या प्राध्यापकांची नियुक्ती, बहुविद्याशाखीय शिक्षण, अध्यापन-संशोधन गुणवत्ता, विद्यार्थी सुविधा अशा सर्वच घटकांवर काम करण्यात येत आहे. विद्यार्थी-शिक्षक संवाद वाढवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण (इंटर्नशीप), विद्यार्थ्यांनी त्यांचे संशोधन परदेशात सादर करण्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. वसतिगृहापासून सगळ्याच संदर्भात धोरणे निश्चित करण्यात येत आहेत. त्याशिवाय आर्थिक व्यवस्थापनातही सुधारणा करण्यात येत आहेत.’

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गोखले संस्था विद्यापीठ म्हणून प्रत्यक्षात येण्यासाठी प्रवेश गुणोत्तर, प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तर, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम राबवणे, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, विद्यार्थी-प्राध्यापकांची परदेशातील विद्यापीठांशी देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प अशा घटकांवर काम करण्यात येत आहे. गोखले संस्थेच्या पुनर्रचनेतून संस्थेचा पूर्वीचा नावलौकिक पुन्हा प्राप्त करणे, सर्वोत्तम संस्था म्हणून घडवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी संस्थात्मक विकास आराखडा (आयडीपी) तयार करण्यात आला आहे. या बदलांचा सकारात्मक परिणाम नक्कीच दिसतील. गोखले संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी गुणवंत, उत्तम कौशल्ये असलेले, बुद्धिमान असावेत हाच उद्देश ठेवण्यात आला आहे,’ असेही डॉ. दास यांनी नमूद केले.

डॉ. संजीव सन्याल यांना कायम ठेवणे स्वाभाविक

‘गोखले संस्थेचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना तडकाफडकी हटवण्याची प्रक्रिया चुकीची होती. कुलपतींची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना नियत कालावधीत काढता येत नाही, असा विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) नियम असल्याचे भारत सेवक समाज संस्थेच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर डॉ. सन्याल यांनी त्यांचा सविस्तर प्रतिसादही दिला. त्यामुळे डॉ. सन्याल यांची नियुक्ती कायम ठेवली जाणे स्वाभाविक आहे,’ असे डॉ. दास यांनी सांगितले.

कुलगुरूंची निवड लवकरच

गोखले संस्थेच्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच नव्या कुलगुरूंची निवड करण्यात येणार असल्याचे डॉ. दास यांनी नमूद केले.