पुणे : मिग २९ या लष्कराच्या लढाऊ विमानातील ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञांनी या बाबतचे संशोधन केले असून, विमानाच्या ऑन बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टिमचे (ओबीओजीएस) पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> ‘रिपाइं’च्या सदस्यत्वाचा डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्याकडून राजीनामा, महायुतीमध्ये रिपाइंला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप
भारतीय वायुसेनेच्या विनंतीनुसार २०२३ मध्ये संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला होता. एनएसएलमधील अजैविक रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय बोकाडे, डॉ. प्रशांत निफाडकर यांनी विद्यार्थ्यांच्या चमूसह संशोधन केले. मिग २९ विमानामध्ये अति उंचीवर वैमानिकांना सतत ऑक्सिजन पुरवठा करणारी ओबीओजीएस ही प्रणाली नायट्रोजन शोषून ऑक्सिजन तयार करण्यासाठी झिओलाइट घटकांवर अवलंबून असते. मात्र, कालांतराने ओलाव्यामुळे झिओलाइटची कार्यक्षमता कमी होते. या अनुषंगाने शास्त्रज्ञांनी पुनरुज्जीवन प्रक्रिया विकसित केली. त्याद्वारे ओबीओजीएस प्रणालीतील ऑक्सिजनची निर्मिती ३० टक्क्यांवरून ८५ टक्क्यांपर्यंत वाढली. या बाबतच्या चाचण्या नाशिक येथे वायुसेनेच्या तळावर करण्यात आल्या. त्यानंतर पुनरुज्जीवित प्रणाली मिग २९ विमानांमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहेत.
हेही वाचा >>> राज्यातील सैनिकी शाळांच्या शुल्कात वीस वर्षांनी वाढ; ‘एनडीए’तील मराठी मुलांचा टक्का वाढविण्यासाठी धोरणात सुधारणा
प्रकल्पाबाबत डॉ. बोकाडे म्हणाले, की एनसीएलने ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी झिओलाइटचे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. झिओलाइटचा स्वदेशी विकासामुळे ओबीओजीएस प्रणालीची दीर्घकालीन कार्यक्षमता सुनिश्चित झाली आहे. चाचण्यांमध्ये ऑक्सिजन शुद्धता ९३ टक्के असल्याचे दिसून आले. त्यामुळे अति उंचीवरील उत्कृष्ट कामगिरी आणि सुरक्षितता निश्चित झाली आहे. नवी प्रणाली मिग २९ विमानांमध्ये कार्यान्वित करण्यास सुरुवात झाली आहे.