लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटातील डोंगरांवरील झाडांची घनता केवळ पावसावर नाही, तर डोंगर उताराच्या दिशेवरही अवलंबून असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पश्चिम घाटात उत्तर किंवा पश्चिम दिशेच्या डोंगर उतारावरील झाडांची संख्या आणि उंची दोन्ही जास्त असून, दक्षिण आणि पूर्व बाजूला उतार असलेल्या डोंगरावरील झाडांची संख्या कमी आणि उंचीही कमी असल्याचे आढळून आले आहे.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) शास्त्रज्ञांनी पश्चिम घाटातील २५ संरक्षित क्षेत्रांतील डोंगरावरील झाडांची घनता आणि उंची या बाबता अभ्यास केला. पृथ्वी आणि हवामानशास्त्र विभागातील डॉ. श्रेयस माणगावे यांच्यासह संशोधक विद्यार्थिनी देवी माहेश्वरी, सृष्टी कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे डॉ. गिरीश जठार, जीआयएस सल्लागार शाम दवंडे यांचाही या संशोधनात सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध एन्व्हायर्न्मेंटल कम्युनिकेशन या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
डॉ. माणगावे म्हणाले, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जंगलाची घनता पश्चिम घाटात कशी बदलते याचा अभ्यास झाला आहे. मात्र, साधारण वर्षभरापूर्वी कोयना येथील सह्याद्री व्याघ्र अभयारण्याला भेट दिली होती. तेथील निरीक्षणांचा आधार घेत केरळपासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत २५ संरक्षित अभयारण्यांचा उपग्रह प्रतिमेद्वारे अभ्यास केला. पश्चिम घाटातील डोंगराच्या उताराची दिशा ही वृक्षांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
सूर्य किरणांमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा दक्षिण आणि पूर्व उतारावरील जमिनीच्या ओलाव्यावर आणि झाडांच्या वाढीवर विपरित परिणाम होत असल्याचे या संशोधनात दिसून आले आहे. साधारण जूनमध्ये दक्षिणायन सुरू होते. याच काळात सप्टेंबरपर्यंत पाऊस पडत असतो. मात्र, पुढे ऑक्टोबर ते मेपर्यंत पाऊस नसतो. या दरम्यान दक्षिण दिशेला असलेला डोंगर उतार तापून जमिनीचा ओलावा लवकर नाहीस होतो. परिणामी वृक्षांच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळत नसल्याने दक्षिणेला डोंगर उतारावरील झाडांची संख्या कमी राहते. त्याचबरोबर त्यांची वाढही कमी होते. सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीचे असमान तापणे झाडांच्या वाढीवर परिणाम करते. म्हणूनच उत्तर किंवा उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेच्या डोंगर उतारावर तुलनेने घनदाट जंगल पाहायला मिळते. त्यामुळे झाडांच्या वाढीसाठी वायव्य दिशेचे डोंगरउतार सर्वांत अनुकूल, तर आग्नेय दिशेचे डोंगर उतार प्रतिकूल ठरत असल्याचे दिसते.
संशोधनाची माहिती सरकारला देण्याचा प्रयत्न
पश्चिम घाटात वनीकरणाचे उपक्रम राबवताना डोंगर उताराच्या दिशेचा झाडांच्या वाढीवर होणाऱ्या परिणामाच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने या संशोधनाची माहिती सरकारच्या पर्यावरण विभाग, वनविभागाला देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती डॉ. माणगावे यांनी दिली.