पुणे : देशात पहिल्यांदाच गीर जातीच्या उच्च वंशावळीच्या वीर्यकांड्यांची आयात करण्यात आली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबी) ब्राझीलमधून गीर वळूच्या ४० हजार वीर्यकांड्यांची (रेतमात्रा) आयात केली आहे. आजवर पैदाशीसाठी उच्च वंशावळीच्या वळूंची (नरांची) आयात केली जात होती. त्यामुळे वीर्यकांड्यांची आयात दुग्ध व्यवसाय क्षेत्रात क्रांतिकारी घटना ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनडीडीबीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनडीडीबीच्या पुढाकाराने देशात पहिल्यांदाच ब्राझीलमधून उच्च वंशावळीच्या गीर जातीच्या वळूच्या वीर्यकांड्यांची आयात करण्यात आली आहे. आजवर जास्त दूध देणाऱ्या जातिवंत जनावरांच्या पैदाशीसाठी देशात विविध जातींच्या उच्च वंशावळीच्या वळूंची आयात केली जात होती. त्यानुसार गीर, जर्सी, होलिस्टन फ्रिजियन जातींच्या वळूंची आयात करण्यात आली आहे. देशातील विविध खासगी संशोधन संस्थांनी तीन वर्षांपूर्वीच केंद्र सरकारकडे उच्च वंशावळीच्या वळूंच्या वीर्यकांड्यांची आणि कृत्रिम गर्भधारणेसाठी गोठवलेले भ्रूण (एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रक्रियेसाठी) आयात करण्यास परवानगी मागितली होती. मात्र, केंद्र सरकारकडून अशी परवानगी देण्यात आली नव्हती. पण, एनडीडीबीच्या पुढाकारामुळे हा मोठा अडथळा दूर झाला आहे.

देशातील विविध संशोधन संस्था आणि राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथील राज्य सरकारच्या आणि चितळे डेअरीचे भिलवंडी, बाएफचे उरळी कांचन आणि एनडीडीबीच्या राहुरी येथील संशोधन प्रक्षेत्रावर दैनंदिन १५ ते २० लिटर दूध देणाऱ्या गाईच्या पोटी जन्मलेल्या वळूंपासून वीर्यकांड्या तयार केल्या जात आहेत. प्रत्यक्षात देशातील गीर गाईंची दैनंदिन दूध देण्याची क्षमता सहा ते दहा लिटर इतकी आहे. त्यामुळे सरासरी ४० ते ६० लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाईच्या पोटी जन्मलेल्या वळूंपासून तयार केलेल्या वीर्यकांड्यांची आयात देशातील दुग्धोत्पादनवाढीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या ४० हजार वीर्यकांड्यांपासून देशात जास्त दूध देणाऱ्या उच्च वंशावळीच्या गीर गाईंची पैदास होण्यास मदत होणार आहे. याशिवाय ब्राझीलच्या भारतातील राजदूतांनी कृत्रिम गर्भधारणेसाठी गोठवलेले भ्रूण (एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रक्रियेसाठी) भारतात आयात करण्याविषयीची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा >>>पुण्यात पाच हजारपेक्षा जास्त शंभरीपार मतदार

देशाचे २०२३मधील वार्षिक दुग्धोत्पादन सुमारे २३०६ लाख टन आहे. सन २०३४ पर्यंत ते ३३०० लाख टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. भारत जगातील आघाडीचा दुग्ध उत्पादक देश असला आणि एकूण जागतिक उत्पादनात २४ टक्के वाटा असला, तरीही देशातील गाईंची दैनंदिन दूध देण्याची क्षमता जेमतेम सहा ते नऊ लिटरपर्यंत आहे. त्यामुळे दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी वीर्यकांड्यांची आयात गरजेची आहे.

अन्य संशोधन संस्थांनाही परवानगी द्या

चितळे डेअरीच्या वतीने तीन वर्षांपूर्वीच उच्च वंशावळीच्या वीर्यकांड्यांची आणि कृत्रिम गर्भधारणेसाठी गोठवलेले भ्रूण आयात करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. पण, केंद्राकडून आम्हाला परवानगी मिळाली नाही. एनडीडीबीच्या माध्यमातून झालेल्या वीर्यकांड्यांच्या आयातीमुळे दुग्ध व्यवसाय क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. देशातील अन्य संशोधन संस्थांनाही वीर्यकांड्या आणि गोठवलेले भ्रूण आयात करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी चितळे डेअरीचे संचालक श्रीपाद चितळे यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importation of semen of high pedigree gir bulls from brazilpune print news dbj 20 amy
Show comments