लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : देशात सवलतीच्या दराने वेगाने खाद्यतेल आयात सुरूच आहे. जुलै महिन्यात उच्चांकी १८.४० लाख टनांची आयात झाली आहे. ऑगस्ट २०२३ मधील १८.५२ लाख टनांच्या खालोखाल एका महिन्यातील ही दुसऱ्या क्रमांकाची उच्चांकी खाद्यतेल आयात आहे.

द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यातील एकूण खाद्यतेल आयात १८.४० लाख टनांवर गेली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये १८.५२ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती. त्यामुळे जुलै मधील खाद्यतेल आयात आजवरची एका महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाची उच्चांकी आयात ठरली आहे. जुलैमधील १८.४० लाख टनांमध्ये पामतेलाचा वाटा १०.८१ लाख टन असून, एका महिन्यातील पामतेल आयातीचीही उच्चांक आहे. ही आजवरची दुसऱ्या क्रमांकाची पामतेल आयात ठरली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये ११.४१ लाख टन पामतेल आयात केले होते.

आणखी वाचा-Sushma Andhare : “सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन चुकलो”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वरातीमागून…”

नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या खाद्यतेल वर्षांतील पहिल्या नऊ महिन्यांत आजवर १२१.२४ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली आहे. मागील वर्षी याच काळातील आयात १२२.५५ लाख टन इतकी होती. मागील वर्षी देशात विक्रमी खाद्यतेल आयात झाली होती, त्या तुलनेत एक टक्क्यांनी आयात घटली आहे.

दरम्यान, देशात आयात करण्यात आलेल्या एकूण १२१.२४ लाख टनांपैकी इंडोनेशियातून पामतेलाची सर्वाधिक २४,९४,२८२ टनांची आयात झाली आहे. त्या खालोखाल मलेशियातूनही पामतेलाची २०,७१,१४८ टनांची आयात झाली आहे. सोयाबीन तेलाची अर्जेंटिनातून १३,५२,५१५ टन, ब्राझीलमधून ७,१०,६३३ टनांची आयात झाली आहे. रशिया देशाला सूर्यफूल तेलाचा पुरवठा करणारा मुख्य देश आहे. रशियातून १३,५२,५१५ लाख टन, रुमानियातून ६,२९,८७८ टन, युक्रेनमधून ३,९६,११६ टन आणि अर्जेंनटिनामधून ३,२५,९२० टन तेलाची आयात झाली आहे.

आणखी वाचा-दस्तनोंदणीसाठी लाच घेणाऱ्या वकिलाला पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई

कच्च्या पामतेलापेक्षा शुद्ध पामतेल स्वस्त

देशात आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर सरासरी ५.५ टक्के तर शुद्ध तेलावर सरासरी १३.७५ टक्के आयात कर आहे. त्यामुळे आयातीचा वेग वाढला आहे. जुलै महिन्यात शुद्ध पामतेल ९४९ डॉलर प्रति टन दराने आणि कच्चे पामतेल ९७९ डॉलर प्रति टन दराने देशातील बंदरांवर दाखल झाले. कच्च्या पामतेलापेक्षा शुद्ध पामतेल स्वस्त झाले आहे. इंडोनेशिया आपल्या देशातील खाद्यतेल शुद्धीकरण उद्योगाला संरक्षण देण्यासाठी, कामगारांना रोजगार मिळावा म्हणून शुद्ध पामतेलावर कमी निर्यात कर लावतो. त्यामुळे आपल्याला शुद्ध पामतेल स्वतात मिळते. पण, शुद्ध पामतेल स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे आपल्या देशातील खाद्यतेल उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडले आहे, अशी माहिती एसईएचे कार्यकारी अध्यक्ष व्ही. बी. मेहता यांनी दिली.