पुणे : लष्कराच्या रस्ते बांधणी संस्थेतील (ग्रेफ) भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा देणाऱ्या तोतया उमेदवारांना पकडण्यात आले. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
रामपती विश्वंभर दयाल (वय २४, रा. पक्कापूर, जि. आग्रा, उत्तरप्रदेश), परमजीत विजयपाल सिंग (वय ३२, रा. बिजोली, जि. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश), सोनू सुरेश (वय २१, रा. कुचराना, जि. जिंद, हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणी त्यांच्या साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण कुमार एस. व्ही. (वय ४६, रा. दिघी कॅम्प) यांनी या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी रस्त्यावर लष्कराची रस्ते विकास बांधणी संस्था (ग्रेफ) आहे. या संस्थेकडून सीमेवर असलेल्या दुर्गम भागात रस्ते बांधणीचे काम केले जाते.
हेही वाचा – बारावीचा निकाल उद्या, लगेचच श्रेणीसुधार परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
या संस्थेतील भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेत आरोपी रामपती दयाल याने परमजीत सिंग याला तोतया उमेदवार म्हणून बसवले होते तसेच सोनू सुरेश याने त्याच्या साथीदाराला तोतया उमेदवार म्हणून बसवले होते. पर्यवेक्षक अरुण कुमार यांनी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. तेव्हा आरोपींनी तोतया उमेदवारांना परीक्षेसाठी बसविले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी तपास करत आहेत.