विद्रोही कवितांचे अभिवाचन, त्या संबंधी छायाचित्रांचे प्रदर्शन याद्वारे सामाजिक अशांततेच्या, हिंसाचाराच्या घटनांवर भाष्य करणाऱ्या ‘पारा गर्निका’ या अनोख्या कलाकृतीचे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या अंतर्गत पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्टस् (पीजीव्हीए)च्या वतीने नुकतेच सादरीकरण झाले.
हिरोशिमावर झालेला अणुबॉम्ब हल्ला, बेचिराख झालेली शहरे, खैरलांजी हत्याकांडाने ढवळून निघालेला समाज, इंडिअन आर्मी रेप केससारखे ओरखडे, आसाम रायफल्सने केलेल्या अत्याचाराच्या घटनांनी हादरलेला समाज, हॉटेल ताजवरील हल्ला यांसारख्या विषयांवर ‘पारा गर्निका’ कार्यक्रमामध्ये सादरीकरण झाले. प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि नरेश गुंड यांनी प्रभावीपणे विद्रोही कवितांचे अभिवाचन केले. पीजीव्हीएचे समन्वयक प्रमोद काळे यांनी कार्यक्रमाच्या सूत्रधाराची भूमिका सांभाळली. मंगेश पाडगावकर, वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ या कवींच्या कवितांचा, त्याचप्रमाणे गणेश विसपुते यांनी रूपांतरित केलेल्या व काही परदेशी कवींच्या कविताही सादर झाल्या. कवितांचे अभिवाचन सुरू असताना कवितांच्या विषयाला धरून काही प्रसंग पडद्यावर दाखविण्यात आले.
२६ एप्रिल, १९३७ रोजी नाझींनी गर्निका शहरावर बॉम्ब हल्ले करून संपूर्ण शहर बेचिराख केले. यामध्ये मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, नागरिक मारले गेले. या घटनेवर आधारित प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो याने काढलेले ‘गर्निका’ हे चित्र प्रसिद्ध झाले. पारा या शब्दाचा अर्थ स्टॉप अर्थात थांबवा, यावरून ‘पारा गर्निका’ या कार्यक्रमाची संकल्पना समोर आली असून, आपण सर्वांनीच वंश, लिंग, जाती, वर्ण यांच्या नावाखाली होणारा हा आक्रोश थांबविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्याचा उद्देश होता, असे प्रमोद काळे यांनी सांगितले. नामदेव ढसाळ यांच्या ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो…’ या कवितेने कार्यक्रमाचा समारोप झाला. सादरीकरणासाठी डॉ. नितीन हडप, विक्रम मराठे यांचे सहकार्य लाभले.
योगी अरविंद व्याख्यानमालाश्री योगी अरविंद सांस्कृतिक मंच आणि भारत विकास परिषद यांच्या वतीने योगी अरविंद व्याख्यानमालेमध्ये विषयांचे वैविध्य असलेली ‘त्रिवेणी’ श्रोत्यांनी अनुभवली. ‘माय लेक’ विषयावर कवयित्री व साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्काराच्या मानकरी डाॅ. संगीता बर्वे आणि गायिका प्रियांका बर्वे यांच्याशी मंचाच्या उपाध्यक्ष सुनेत्रा मंकणी यांनी संवाद साधला. ‘आजीला ज्ञानेश्वरी वाचून दाखविण्यातून निर्माण झालेली साहित्याची आवड आणि वाचनातून आलेले संचित यातून लेखन आपोआप स्फुरले,’ असे संगीता बर्वे यांनी सांगितले. ‘‘गंमत झाली भारी’ या कार्यक्रमातून फक्त गाणंच नाही, तर अभिवाचनातून अभिनयाची गोडी लागली. ‘मुघल-ए-आझम’ नाटकातील भूमिका ते लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी त्यांच्यासमोर गायनाची मिळालेली संधी हा त्यांचा आशीर्वाद होता,’ अशी भावना प्रियांका बर्वे यांनी व्यक्त केली. कवितांचे सादरीकरण आणि गायनातून माय-लेकीने पहिले सत्र रंगविले.
‘सोशल मीडियावरील नॅरेटिव्हचे युद्ध’ या विषयावर तुषार दामगुडे यांचे व्याख्यान श्रोत्यांना वेगळ्या विश्वाची माहिती करून देणारे ठरले. प्रत्येकालाच बातमीदार व्हायचे असल्याने समाज माध्यमांवर मिळालेल्या महितीची खातरजमा न करता ती पुढे पाठविण्यावर भर दिला जातो, याकडे दामगुडे यांनी लक्ष वेधले. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ या विषयावरील प्रदीप रावत यांच्या व्याख्यानाने या व्याख्यानमालेचा समारोप झाला. ‘अहिल्यादेवींनी शिवशाही कृतीमध्ये आणली. त्यांना आत्मबोध आणि शत्रूबोध दोन्ही होते. टोपीकर इंग्रजांना ओळखून त्यांनी पेशव्यांना सावध केले होते,’ असे रावत यांनी सांगितले. काशीच्या मंदिराचे पुनरुज्जीवन करणाऱ्या अहिल्यादेवी खासगी कोषातून दानधर्म करत असत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि धर्मशाळा बांधल्या, असेही त्यांनी सांगितले. मंचाच्या वतीने लहान मुला-मुलींसाठी क्रांतिकारकांच्या गोष्टी उलगडणारे कथाकथन होणार असल्याची माहिती मंचाचे डाॅ. जगदीश करमळकर यांनी सांगितले.
vidyadhar.kulkarni@expressindia.com