अल्पवयीन मुले व नवतरुणांचा गुन्ह्य़ांमधील वाढता सहभाग चिंतेचा विषय ठरत असतानाच, घरच्या मंडळींचे दुर्लक्ष आणि कायद्याचा वचक वाटत नसल्यामुळे तरुणाई उन्मत्त झाल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड शहरभरात सर्वसामान्यांना जागोजागी दिसून येत आहे. राजकीय मंडळींचा आशीर्वाद आणि पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे या उन्मादाला खतपाणीच मिळते आहे. फटाक्यांची न थांबणारी आतषबाजी, कर्कश आवाज करणारी वाहने घेऊन काढल्या जाणाऱ्या फेऱ्या आणि हत्यारे घेऊन मिरवण्याची हौस या रात्रीच्या वेळी चालणाऱ्या प्रकारांमुळे शहरातील नागरिकांच्या झोपा उडालेल्या आहेत.
नवतरुणाईला भाईगिरीचे प्रचंड आकर्षण असल्याचे चित्र शहरात वेळोवेळी पुढे आले आहे. मात्र, त्याला आवर घातला जात नसल्याने नागरिकांना मोठय़ा डोकेदुखीला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील ‘महाराज’, ‘साहेब’ ‘दादा’, ‘भाई’, ‘भाऊ’, ‘अप्पा’, ‘अण्णा’ अशांचे या ‘उद्योगी’ तरुणाईला पाठबळ मिळत आहे. महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसा हा उन्माद वाढू लागला आहे. घरात साजरे होणारे वाढदिवस रस्त्यावर आल्याने अनेकांच्या डोक्याला ताप झाला आहे. रात्री सुरू होणारी फटाक्यांची आतषबाजी उशिरापर्यंत चालू राहते.
जोरजोरात हॉर्न वाजवून दुचाकी गाडय़ांची रॅली काढले जाते. ‘ठो’, ‘फट्-फटाक्’ असे विचित्र आवाज काढून नागरिकांना जाणीवपूर्वक घाबरवले जाते. वाहनांवरून जाताना खुलेआम हातात शस्त्रे नाचवली जातात. अलीकडेच, कासारवाडीत एका वाढदिवसानिमित्त गटागटाने दुचाकीवर बसून जाणाऱ्या तरुणांनी तलवारी मिरवण्याचा प्रकार झाला. ठरावीक कालावधीनंतर असा रात्रीचा उच्छाद येथे सुरूच असतो. निगडी ओटा स्कीमला काही दिवसांपूर्वी वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्यात आला. असे रात्रीचे अनेक उद्योग शहरभरात सुरू आहेत. महाविद्यालयांसमोर तरुणांची हुल्लडबाजीही सुरू आहे, एकही महाविद्यालय त्याला अपवाद नाही. आकुर्डी, पिंपरीतील महाविद्यालय परिसरात असे प्रकार सर्वाधिक दिसून येतात. उद्यानांमध्ये शालेय तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींचे चाळे मर्यादेपलीकडे गेले आहेत. पिंपरी बाजारपेठेत लहान मुले सुसाट वेगाने वाहने चालवतात, पोलिसांचे त्यांच्यावर नियंत्रण नाही. या भागात रस्ते अडवून क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांना कायद्याचा कसलाही धाक नाही. संत तुकारामनगरमध्ये नेहमीच दारूच्या आणि मटणाच्या पाटर्य़ा सुरू असतात.
थेरगाव, काळेवाडीत गावगुंडांचा सुळसुळाट आहे. गांधीनगरमध्ये कायम हाणामाऱ्या होत आहेत. पिंपळे-सौदागरच्या शिवार ते कोकणे चौकात दर शनिवारी रात्री आयटीतील युवक-युवतींचा धिंगाणा सुरू असतो. गाडय़ा रस्त्यावर लावून जोरजोरात गाणी वाजवणे व त्यावर नाचणे हा नियमित उद्योग झाला आहे. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येते. आकुर्डी रेल्वे स्थानक ते पुनवळ्याचा झुलता पूल दरम्यान होणारा ‘कल्ला’ ही येथील रहिवाशांच्या दृष्टीने नेहमीची डोकेदुखी झालेली आहे. पोलिसांचा वचक राहिला नसल्याने अशाप्रकारांना आळा न बसता या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसते आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा