पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत राज्यभरात ३९ परीक्षा केंद्रांवर १५४ गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यात सर्वाधिक गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागात नोंदवले गेले आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. पहिल्याच दिवशी ४२ गैरप्रकार उघडकीस आले. आतापर्यंत बारावीच्या परीक्षेत पुणे विभागातील ६ केंद्रांवर १८, नागपूर विभागातील दोन परीक्षा केंद्रांवर तीन गैरप्रकार, अमरावती विभागातील तीन परीक्षा केंद्रांवर सहा गैरप्रकार, नाशिक विभागातील पाच परीक्षा केंद्रांवर नऊ गैरप्रकार, लातूर विभागातील तीन परीक्षा केंद्रांवर सात गैरप्रकार, तर कोकण विभागातील एका परीक्षा केंद्रावर एका प्रकरणाची नोंद झाली आहे. तर एकूण १५४ गैरप्रकारांतील १०४ गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागातील १७ परीक्षा केंद्रांवर नोंदवले गेले आहेत. बारावीच्या परीक्षेत आणखी काही पेपर होणे बाकी आहे. त्यामुळे परीक्षा संपल्यावर गैरप्रकारांची अंतिम आकडेवारी उपलब्ध होईल.

यंदा पहिल्यांदाच परीक्षेच्या काळात संवेदनशील परीक्षा केंद्रांवर देखरेख करण्यासाठी ड्रोन कॅमेरे वापरण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणीही करण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. एकूणच कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने करण्यात येत आहे. गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यानुसार संपूर्ण परीक्षेच्या काळात नोंदवलेल्या गैरप्रकारांची तपासणी करून भरारी पथकांनी पकडलेल्या गैरप्रकारांबाबत संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे, असे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.

Story img Loader