चाकण परिसरात 20 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी आणखी नऊ जणांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 85 लाख रोख रक्कम आणि मुख्य आरोपीची 75 लाखांच्या जमिनीचे कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी छोटा राजन टोळीचा सदस्य हा मुख्य म्होरक्या असल्याचं पोलीस तपासात समोर आले असून रांजणगाव येथील बंद पडलेल्या केमिकल सुयोग बायोटेक लिमिटेड कंपनीत ड्रग्ज बनवत असल्याचं समोर आले आहे. या सर्व आरोपींना मुंबईमधून अटक करण्यात आली असून यात एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे. एकूण १४ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी मुख्य आरोपी तुषार सुर्यकांत काळे वय (42) बोरीवली पश्चिम मुंबई, राकेश श्रीकांत खानीवडेकर वय (32) नवी मुंबई हे दोघे मुख्य आरोपी असून किरण मच्छिंद्र काळे वय (32) शिरुर पुणे, अशोक बाळासाहेब संकपाळ वय (37) किरण दिनकर राजगुरु वय (32) कुलदीप सुरेश इंदलकर वय (36) जुबेर रशीद मुल्ला वय (39) ऋषिकेश राजेश मिश्रा वय (25) जुबी उडोको वय (41) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

चाकण परिसरातून 20 कोटींचे मेफेड्रॉन ड्रग्ज अमली विरोधी पथकाने पकडले होते. त्यात पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. घटनेत बॉलिवूडचे देखील काही कनेक्शन आहे का? याचा शोध घेतला जात होता. तेवढ्यात, पोलिसांच्या वेगवेगळ्या सहा तपास पथकाने मुंबई परिसरात राहून इतर नऊ आरोपींना अटक केली असून त्यात मोठा खुलासा झाला आहे. दरम्यान, त्यात छोटा राजन टोळीचा सदस्य तुषार काळे हा मुख्य असल्याचं समोर आले आहे. सराईत गुन्हेगार तुषार याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून त्याने तुरुंगातील एका आरोपीकडून ड्रग्स कसे बनवायचे याची माहिती घेतली. त्यानंतर त्याने रांजणगाव येथील बंद पडलेल्या सुयोग बायोटेक लिमिटेड या कंपनीत इतर साथीदारांच्या मदतीने 132 किलो मेफेड्रोन ड्रग्स बनवले होते.

त्या पैकी 112 किलो ड्रग्ज नायझेरियन आरोपी जुबी उकोडो याला तुषार काळे याने पूर्वीच विकले आहे. उर्वरित 20 किलो ड्रग्ज अक्षय काळे याने आपल्या घरी ठेवले होते. ते विक्री करायला जात असताना अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरातून पकडले आणि आरोपींना अटक केली होती. छोटा राजन टोळीचा सदस्य तुषार आणि दुसऱ्या मुख्य आरोपी राकेश श्रीकांत खानीवडेकर या दोघांनी 85 लाखांचे ड्रग्ज विकले होते त्याची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच आरोपी तुषारची पालघर येथील दोन एकर जमिनीची कागदपत्रे ज्याची मूळ किंमत 75 लाख आहे ती कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. यात आणखी काही आरोपी भेटण्याची शक्यता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वर्तवली आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In 20 crore drug case chhota rajan gang member arrested dmp 82 kjp