पुणे : दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत. सरकार सहावा दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष करत असल्याने संदीप दराडे व अंकुश शेटे यांनी सुरू केलेल्या उपोषणात बेमुदत अन्नत्याग करत डॉ. अजित नवले यांनी उपोषणास सुरुवात केली आहे.
दुधाचे दर कोसळल्याने महाराष्ट्रभरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने आदेश देऊनही सहकारी व खाजगी दूध संघांनी हा आदेश पाळण्यास २२ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत नकार दिला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज खा. सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाजमाध्यमातून व्यक्त केली आहे.
हेही वाचा : आज मुंबईतून पुण्याला जाण्याचा विचार करत असाल तर हे वाचाच….
अकोले येथे सुरू असलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, सरकारने तातडीने या प्रश्नात ठोस तोडगा काढावा, असे आवाहन दूध उत्पादकांनी केले आहे. उपोषणास शेकडो ग्रामपंचायती व दूध संकलन केंद्रांनी ठराव करून पाठिंबा दिला आहे. आंदोलन स्थळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, आजी, माजी आमदार व खासदार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. दुधाला ३४ रुपये भाव जोवर मिळत नाही व दुध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटमारी, खाजगी संस्थांना लागू असणारा कायदा आदी प्रश्नी कार्यवाही केल्या शिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले आहे.