पुणे : जीवनाच्या सर्व क्षेत्रांप्रमाणेच चित्रकलेमध्येही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. मात्र, चित्रकला जोपासायची असेल तर ‘एआय’चा वापर टाळून ‘स्केच बुक’च्या माध्यमातून चित्र साकारणे योग्य ठरेल,’ असा गुरुमंत्र शताब्दी वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी शनिवारी नवोदित चित्रकारांना दिला.
आकुर्डी येथील डाॅ. डी. वाय. पाटील काॅलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्सच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आलेल्या वार्षिक कला प्रदर्शनात शि. द. फडणीस यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी फडणीस बोलत होते. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डाॅ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम, प्राचार्य जयप्रकाश कलवले, समन्वयक प्रा. शंकर आडेराव या वेळी उपस्थित होते. सोमवारपर्यंत (३१ मार्च) खुले असलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी चितारलेली चारशेहून अधिक चित्रांचा समावेश आहे.
फडणीस म्हणाले, ‘चित्रकारांच्या रेषा बोलतात. त्यामुळेच साहित्यामध्ये चित्राला स्थान मिळाले. केवळ छंद म्हणूनच चित्रकला जोपासायची असे मी ठरवले होते. मात्र, या कलेचे समर्थ्य ओळखले आणि रेषांमधून निखळ आनंद देणाऱ्या व्यंगचित्रकलेमध्ये रमलो. चित्रकलेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कारकीर्द घडवता येते. पं. नेहरू यांनी केवळ चित्रकला शिकण्यासाठी इंदिरा गांधी यांना शांती निकेतनला पाठविले होते. नोबेल पुरस्कारप्राप्त कवी रवींद्रनाथ टागोर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. होमी भाभा हेदेखील चित्रकार होते.’
भारतीय कला विश्वामध्ये शिल्पकार राम सुतार आणि व्यंगचित्रकार शि. द. फडणीस हे दोन स्तंभ आजही कार्यरत आहेत, असे सांगून पालव म्हणाले, ‘मनाचा स्पर्श तंत्रज्ञानात नाही. त्यामुळे कला जोपासताना तंत्रज्ञानाचा वापर टाळला पाहिजे. दुर्लक्षित झालेली सुलेखनाची कला आता समाजाला माहीत होत आहे. नवे सुलेखनकार घडत असून हा वारसा पुढे सुरू ठेवायचा आहे.’
फडणीस आणि पालव यांच्या हस्ते सिद्धी कुंभार, समीक्षा पाटील, पूजा गोल्डर, श्रुती तापकीर, आर्या पाटील, सानिका पिपाडा, स्वर्ण पाटील, सार्था राजकुंवर, मनीष गुणाला, अनुराग भारती, वैष्णवी बाबर, नेहा बर्वे या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. प्राचार्य जयप्रकाश कलवले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रियांका कुंजीर यांनी सूत्रसंचालन केले. देवश्री कुलकर्णी यांनी आभार मानले.