आळंदी : वाराणसीतील ज्ञानवापी माशीदीबाबत राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याप्रमाणे शांततेत अयोध्येत श्रीराम मंदिर झालं त्याचप्रमाणे ज्ञानवापीबाबत पक्षकार मुस्लिम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. मशीद दुसरीकडे करावी, असे आवाहन गोविंदगिरी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराबाबत विधान केले. या दोन्ही मंदिरांसाठी आम्ही आग्रही असून दोन्ही मंदिरे पूजा करण्यासाठी उपलब्ध करावीत. तसं सध्या अनुकूल वातावरण असल्याचं गोविंद गिरी महाराज यांनी सांगितलं आहे. गोविंदगिरी महाराज हे आळंदीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : पुणे : नगर रस्त्यावर गांजा विक्री, उत्तर प्रदेशातील दोघांना अटक
गोविंदगिरी महाराज म्हणाले, प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा शांतीपूर्ण झाला आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली याचा आनंद आहे. आमचा आग्रह आहे की काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर हे देखील पूजा करण्यासाठी उपलब्ध व्हावं. यासाठी आता अनुकूल वातावरण तयार होत आहे. इतिहास साक्षी आहे. काशी विश्वनाथचा जो मुख्य नंदी आहे, त्याचं तोंड मशीदीकडे आहे. नंदीचं तोंड हे केवळ महादेवाकडे असतं. याचा अर्थ आहे की त्याठिकाणी महादेवाचं वास्तव्य होतं. आजही काही अवशेष आहेत. हे पाहता इतर आमच्या बंधूंनी मोठं मन करून हे म्हणलं पाहिजे की काही हरकत नाही. या आणि पूजा करा. मशीद दुसरीकडे होऊ शकते. हे काम आपण शांततेत आणि बंधुत्व भावातून केले पाहिजे, असे गोविंदगिरी महाराज म्हणाले.