आळंदी : इंद्रायणी जल प्रदूषणावरून सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. इंद्रायणी नदीमध्ये उतरून मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या वतीने तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात आले. रासायनिक पाणी सोडणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वारकरी आणि भाविकांच्या भावनेशी हे सरकार खेळत आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे, असे मत मानवी हक्क संरक्षण संस्थेने व्यक्त केले.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने प्रदूषीत इंद्रायणी नदीमध्ये तोंडाला काळया पट्ट्या बांधून आंदोलन करण्यात आले. आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन वारकरी दाखल होतात. पवित्र नदी इंद्रायणीमध्ये स्नान करतात. मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. इंद्रायणीचा श्वास गुदमरतो आहे. मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होत आहे. पिंपरी- चिंचवड भागातील रसायनयुक्त प्रक्रिया न केलेले पाणी सोडले जात असल्यामुळे इंद्रायणीत जल प्रदूषण होत आहे, असा आरोप संस्थेच्या वतीने करण्यात आला.
हेही वाचा : पुणे : एनडीए रस्त्यावर मद्यविक्री दुकानावर दरोडा; मद्याच्या बाटल्यांसह रोकड लुटली
लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेला आणि आळंदी नगरपरिषदेला खडबडून जागे करण्यासाठी सामाजिक संस्था यांच्याकडून मूक आंदोलन करण्यात आले. इंद्रायणीत रासायनिक पाणी सोडणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.