पिंपरी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्तपदी डावलल्याने आळंदीकर ग्रामस्थांनी कार्तिकी यात्रेच्या पहिल्याच दिवशी निषेध मोर्चा काढला. मंदिरासमोर काही काळ ठिय्या मांडला. बंदलाही प्रतिसाद मिळत असून बंदमुळे वारकऱ्यांची गैरसोय होताना दिसत आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तपदी नुकतीच तीन विश्वस्तांची नेमणूक जिल्हा न्यायाधीशांनी जाहीर केली. तत्कालीन तीन विश्वस्तांच्या शिफारशीमुळे नवीन तीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिकांनी आज बंदचे आवाहन केले.
हेही वाचा : ‘मुळशी पॅटर्न’ चर्चेत! शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले
चाकण चौक ते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. टाळ वाजवत हा मोर्चा काढला. विश्वस्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी आळंदीत दाखल झाले आहे. सोहळ्याला कोणताही अडथळे निर्माण होणार नाही. त्याचबरोबर आमच्या मागण्या लोकशाही पद्धतीने मागणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.