पुणे : आई-वडिलांच्या पंखाखाली उत्तम शिकलेली मुले आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मायभूमी सोडून परदेशात जात अर्थप्राप्ती केल्यानंतर सातासमुद्रापार भारतीय संस्कृती जतनाचे काम यशस्वीपणे करत आहेत. अमेरिकेतील सियाटेलमध्ये साकारण्यात आलेले गजानन महाराजांचे आणि विठ्ठल-रखुमाईचे मंदिर हे त्यांची साक्ष देणारे उदाहरण ठरले आहे. येथील साईबाबा मंदिरामध्ये गजानन महाराज आणि विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची सोमवारी (१७ फेब्रुवारी) प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सियाटेलमध्ये स्थानिक मराठीजन आपली संस्कृती, उत्सव उत्साहाने जपत आहेत. रेडमंड येथे शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर आहे. या मंदिरामध्येच साईबाबा यांचे समकालीन असलेल्या शेगाव येथील गजानन महाराजांचे मंदिर साकारण्यात आले. या साईबाबा मंदिरामध्ये प्रत्येक रविवारी भाविक एकत्र येतात. अभिषेक करून नैवेद्य दाखविला जातो. जवळच्या एका बालकल्याण केंद्रात पन्नास मुलांसाठी भोजन पाठविले जाते. त्यांचे प्रसाद भोजन झाल्यानंतर भाविक आनंदाने प्रसाद ग्रहण करतात. एवढेच नव्हे तर, प्रसाद बनविण्याचे कामही भक्तगण करतात. मंदिराची स्वच्छता करूनच भाविक रात्री घरी परततात. 

या मंदिरामध्ये गजानन महाराज आणि विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्तीची सोमवारी प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. शेगाव येथील गजानन महाराजांची मूर्ती ज्यांनी घडविली त्यांच्या मुलाने शेगाव येथील समाधी मूर्तीची हुबेहूब मूर्ती साकारली आहे. तर, विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती पंढरपूरच्या मूळ मूर्तीची प्रतिकृती असून, या मूर्ती जयपूर येथील कलाकारांनी सर्व धार्मिक बंधनांचे पालन करून घडविल्या आहेत. 

गजानन महाराजांच्या भक्तांनी या मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी १०८ नद्यांचे जल आणि सर्व तीर्थक्षेत्रांहून पवित्र माती आणली हाेती. मंदिरामध्ये होणाऱ्या प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी शनिवारपासून (१५ फेब्रुवारी) दोन दिवस गोमाता पूजन, होमहवन, भजन, पारायण, हरिपाठ आणि महाप्रसाद असे विविध धर्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. या मंदिरातील गजानन महाराजांची मूर्ती ही उत्तर अमेरिकेतील सर्वांत मोठी आहे. यानिमित्ताने उत्तर अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून, फडके गुरुजी या सोहळ्याचे पौराेहित्य करणार आहेत. अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या कर्तबगार आणि यशस्वी तरुणांनी या सोहळ्याचे नियोजन केले आहे.