घराबाहेर फिरताना स्वाइन फ्लूबद्दल काळजी घेऊ लागलेले नागरिक डेंग्यू तापाबद्दल मात्र अनभिज्ञच असल्याचे दिसून येत आहे. घराजवळ तसेच कामाच्या ठिकाणी डासांची वाढ झालेली आढळल्यास महापालिकेने खटले भरण्याची मोहीम सुरू केली आहे. परंतु डासांची वाढ टाळण्याबद्दल नागरिक फारसे गंभीर नसल्याचे उघड झाले आहे. ऑगस्टमध्ये शहरात १०४ जणांना डेंग्यू झाला असून ही संख्या ऑगस्टमधील स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येपेक्षा अडीच पटींनी अधिक आहे. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत ३२ जणांना डेंग्यू झाला आहे.   
पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभाग प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ‘‘डासांच्या वाढीबद्दल नोटिस देऊनही त्याबद्दल संबंधित नागरिक निष्काळजीपणा दाखवत असल्याचे दिसते. आतापर्यंत शहरात दहा ठिकाणी डासोत्पत्ती आढळल्याबद्दल संबंधितांवर खटले भरण्यात आले आहेत. या दहा प्रकरणांमध्ये बांधकामाच्या जागा, तळघरे, प्लास्टिकच्या टाक्या, हौद, तरणतलाव, गांडूळ खताचे प्रकल्प, इमारतीतील लिफ्टचे डक्ट, थर्माकोलची खोकी, टायर्स अशा ठिकाणी डासांची वाढ झालेली आढळली आहे. पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे आता डेंग्यूची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या सुमारास थंडी सुरू झाल्यावर डासोत्पत्ती कमी होत असल्यामुळे आजाराची लागणही कमी होईल.’’
 स्वाइन फ्लूबद्दल समाजात अकारण भीती असून त्या तुलनेत डेंग्यूकडे नागरिकांचे फारसे लक्ष नसल्याचे मत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. प्रसाद राजहंस यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘२००९-१० मध्ये स्वाइन फ्लूचा जेवढा प्रादुर्भाव होता, तेवढा या वर्षी नाही. स्वाइन फ्लूबद्दल घराबाहेर पडताना योग्य काळजी घेणे, लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. परंतु स्वाइन फ्लूच्या तुलनेत डेंग्यूबद्दल समाजात अनभिज्ञता दिसत असून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती टाळण्याकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. या डासांची वाढ स्वच्छ पाण्यात होते. तसेच हा डास दिवसा चावत असल्यामुळे केवळ मच्छरदाणी वापरून किंवा डास पळवणारी क्रीम शरीराला लावून फायदा होत नाही.’’

डेंग्यूची लक्षणे-
ताप, तीव्र अंगदुखी, अंगावर लाल पुरळ, लाल चट्टे
डासांची पैदास टाळण्यासाठी-
– पाच दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साठवू नका. भांडी स्वच्छ धुऊन मगच भरा.
– फ्रिज, वातानुकूलन यंत्रणा, फुलदाण्या अशा वस्तूंमध्ये तीन दिवसांहून जास्त काळ पाणी साठू देऊ नका.
– पाण्याच्या टाक्यांची झाकणे घट्ट लावा.
– फुटक्या बाटल्या, रिकाम्या कुंडय़ा, फुटके डबे, रिकामी शहाळी, नारळाच्या करवंटय़ा, टायर्स अशा कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावा.