पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीमधून राष्ट्रवादीकडून (शरद पवार) युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू असताना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज (३ ऑक्टोबर) बारामतीत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून, ते काय बोलणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बारामतीच्या मतदारांनी दिलेला कौल अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, काही महिन्यांपूर्वी बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर सभेतून थेट जाहीर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात चांगलीच खळबळ उडाली होती. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेत यावर खुलासा केला होता.

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवार यांचे नाव आघाडीवर असून, भावी आमदार अशा आशयाचे फलकदेखील लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक न लढण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र जय पवार त्यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच आज राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा बूथ कमिटी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वृंदावन गार्डन येथे हा मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे स्वत: उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ते काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पक्षाचे निरीक्षक सुरेश पालवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : Navratri 2024: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा बारामतीच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या बारामती शहरात आणि तालुक्यात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महिलांवर अत्याचार व खुनाच्या घटना घडत असून, चोरी, तसेच लूटमारीच्या घटनादेखील वाढत आहेत. यावर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने गुरुवारी होणाऱ्या पक्षाच्या या मेळाव्यामध्ये अजित पवार नक्की काय भूमिका घेणार, काय बोलणार, याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. या मेळाव्याकडे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे देखील लक्ष असणार आहे.