पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये शरद पवार यंदा मुंबईऐवजी बारामतीच्या माळेगावमधून मतदान करणार आहेत. काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपले मतदान केंद्र बारामतीमधून मुंबईमध्ये बदलून घेतले होते, मात्र यंदा निवडणूक अटीतटीची असल्याने ते पुन्हा बारामतीमध्ये मतदान करणार आहेत. तसेच आपल्या गोविंदबाग येथील निवासस्थानी दिवसभर थांबणार आहेत.
१९६७ पासून पवार हे बारामतीच्या रिमांड होम या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत होते. २०१४ पर्यंत ते पवार कुटुंबीयांसोबत रिमांड होम येथे मतदान करायचे. मात्र, पक्षात पडलेल्या फूटीनंतर शरद पवार पुन्हा बारामतीमध्ये मतदान करण्याचा निर्णय घेतला. माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत ते मतदान करणार आहेत. मतदानाच्या दिवशी शरद पवार हे गोविंदबागेतच थांबणार आहेत.
शरद पवारांनी लोकसभा निवडणूकीमध्ये २२ दिवसांत ५२ सभा घेतल्या आहेत. काल बारामती मध्ये सांगता सभेमध्ये त्यांना थकवा जाणवत होता. पुढील काही शरद पवार आराम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे पुण्यातील काही नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.
हेही वाचा : पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात दोन खून
लोकसभा निवडणूकीमध्ये अजित पवार एकाबाजूला आणि त्यांचे उर्वरित सारे कुटुंब दुसर्या बाजूला सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी उभे राहिलेले दिसले आहे. पवार कुटुंबातील सार्या लेकी, सुना सुप्रिया सुळेंसाठी प्रचारात फिरताना दिसल्या. कालच्या सांगता सभेमध्येही सारे पवार कुटुंब सभेत उपस्थित राहून सुप्रिया सुळेंसाठी मतदान करण्याचे आवाहन करत होते.