बारामती : घरातील विजेचे बिल जास्त येते म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या ग्राहकाने मोरगाव (ता. बारामती) येथील महावितरण कार्यालयात तांत्रिक महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने १६ वार करून खून केला. कोयत्याने वार करणाऱ्या अभिजीत पोते या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
रिंकू गोविंदराव बनसोडे (वय ३४ ) असे खून झालेले महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या मूळच्या लातूर शहरातील रहिवासी असून, दहा वर्षापूर्वी महावितरणच्या सेवेत दाखल झालेल्या होत्या. गेल्या दहा वर्षापासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांच्या सुटीनंतर त्या बुधवारी मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या.
हेही वाचा…शिरूरची उमेदवारी छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन एकनाथ शिंदेंचा होता पण… – अमोल कोल्हे
मोरगाव येथील कार्यालयात त्या एकट्याच असताना सव्वाअकराच्या सुमारास आलेल्या अभिजीत पोटे या व्यक्तीने रिंकू यांना बिल जास्त आल्याचा जाब विचारला. त्याच्याशी बोलत असतानाच अभिजित याने हातातील कोयत्याने एका मागोमाग एक असे १६ वार रिंकू यांच्या हाता-पायावर आणि तोंडावर केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. मोरगाव येथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे दुपारी तीनच्या सुमारास निधन झाले. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.
हेही वाचा…मावळ : ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी गुपचूप आल्या आणि अर्ज भरून निघून गेल्या!
५७० रुपयांच्या वीज बिलासाठी हल्ला
ज्याने हल्ला केला त्या आरोपीचे वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. त्याचे एप्रिल महिन्याचे ६३ युनीट वीजवापराचे वीजबिल ५७० रुपये इतके आहे. मागील बारा महिन्यांचा वापर तपासण्यात आला असता तो ४० ते ७० युनिटमध्ये आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर ३० युनिटने वाढला असून त्याचे बिल ५७० आले होते. हे बिल वापरानुसार आणि नवीन दरानुसार योग्यच आहे. तसेच या ग्राहकाने वीजबिलाबाबत कोणतीही लेखी अथवा ऑनलाईन तक्रार नोंदवली नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.