बारामती : पंचवीस वर्षे मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले असे म्हणायचे! पुढच्या काही वर्षांत दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करत नाही. यासारखा नालायक माणूस नाही, अशा जळजळीत शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच पवार कुटुंबियांतही द्विधा मनस्थिती होती. असे असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी या पवारांच्या गावात ग्रामस्थांबरोबर एक बैठक पार पडली. या बैठकीला श्रीनिवास पवार यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा : लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे मूत्रपिंड प्रत्यारोपण; चिरफाड न करता शस्त्रक्रिया यशस्वी
श्रीनिवास पवार म्हणाले, की पवार साहेबांचे वय ८३ झाले आहे. या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. मला काही व्यक्ती म्हणाल्या इथून पुढची वर्ष दादांची आहेत, साहेबांची नाही. हा विचार मला वेदना देऊन गेला. भाजपने पवार साहेबांना संपवण्याचा खूप प्रयत्न केला. घरातला कुणीतरी फोडल्याशिवाय ते घर संपत नाही. हा इतिहास आहे. घर एक असेल तर ते संपवू शकत नाही. वय वाढले म्हणून तुम्ही वयस्कर माणसाला कमजोर समजू नका.
हेही वाचा : गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण! पूर्ण गुडघ्याऐवजी फक्त घर्षण झालेला भाग बदलून उपचार
श्रीनिवास काकांची भूमिका योग्य – रोहित पवार
श्रीनिवास काकांची भूमिका योग्य आहे, स्वतःच्या भुमिकेमुळे ‘दादां’चे कुटुंब एकटे पडले, अशी टिप्पणी आमदार रोहित पवार यांनी केली. रोहित पवार म्हणाले की, श्रीनिवास काकांचा व्हीडिओ मी पाहिला आहे. लोकांना वाटते तीच भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांनी दादांना आणि साहेबांनाही जवळून बघितले आहे. श्रीनिवास पवार यांची भूमिका पवार कुटुंबीय म्हणून सामान्य माणसांना पटणारी भूमिका आहे. पवार साहेब हे पवार कुटुंबीयांची ओळख आहेत. श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंबीयांची संस्कृती बोलून दाखवली आहे. अजित पवार यांनी भूमिका घेतल्यावर कुटुंब म्हणून आम्हाला वाईट वाटलं होते. कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत. पण, दादांसह त्यांच्या जवळच्या पवारांनी म्हणजेच काकींनी आणि त्यांच्या दोन मुलांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र, पवार कुटुंबात शंभरहून अधिक जण आहेत.