पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेत आमदार सुनिल शेळके यांनी अनेक प्रश्न मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे अवघ्या महिनाभरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी विकासकामांसाठी निधी आणण्याचे काम करतात. परंतु, रस्त्यांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. अशा रस्त्यांवर जर अपघात झाले तर याला जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी सोमवारी पावसाळी अधिवेशनात केली.
मागील साडेतीन वर्षांत मावळ तालुक्यातील प्रशासकीय इमारत, नदीवरील पुल, उपजिल्हा रुग्णालये, तलाठी कार्यालये यांसह तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले. नाणोली येथे पूल नसल्याने जीव धोक्यात घालून आजही बोटीने प्रवास करावा लागतो. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व अनेकदा निधीची मागणी करुनही निधी मंजूर न झालेल्या कुंडमळा येथील पूल, वराळे- नाणोली पूल, सांगवडे- मामुर्डी पूल या पुलांसाठी निधी द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
हेही वाचा – पुणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार; चौघांना अटक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या- येण्यासाठी वेळेवर एसटी बसची सोय नसल्याने आजही अनेक विद्यार्थी पायपीट करत शाळेमध्ये शिक्षणासाठी येतात. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आमदार निधीतून सायकली वाटप किंवा बसेस सुरु करण्यासाठी मंजुरी द्यावी, अशीही मागणी आमदार शेळके यांनी केली.
‘जांभूळला क्रीडा संकुल तर तळेगावला नाट्यगृह हवे’ मावळ तालुक्यात क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक युवक- युवती उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. परंतु, मावळ तालुक्यात अद्याप अद्ययावत असे क्रीडा संकुल नाही. जांभूळ येथील गायरान जागेवर क्रीडासंकुल बांधण्यास मान्यता मिळावी यासाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे. त्यास मान्यता द्यावी. तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या तळेगाव दाभाडे शहरात नाट्यगृह व्हावे. या शहरातून अनेक कलावंत घडले आहेत. कलापिनी, श्रीरंग कला निकेतन यासारख्या संस्था सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शहरात नाट्यगृह उभारण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणीही आमदार शेळके यांनी अधिवेशनात केली.
अतिक्रमण कारवाई छोट्या व्यावसायिकांवरच का?
लोणावळा शहरात काही वर्षांपूर्वी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती नेमण्याचा उद्देश या भागातील अतिक्रमणांवर नियंत्रण राहावे असा होता. परंतु, या समितीकडून सर्वसामान्य नागरिकांच्या, छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या, शेड यावरच कारवाई होताना दिसते. शहरातील मोठ्या हॉटेलांसमोरील शेड, अतिक्रमण यावर कारवाई का होत नाही, असा सवाल आमदार शेळके यांनी यावेळी उपस्थित केला.