पुणे शहरातील खड्डे हा आता थट्टेचा विषय बनू लागला असून सजग नागरिक मंच या स्वयंसेवी संस्थेने त्याबद्दल पुणे महापालिका प्रशासनास जाहीररित्या (अप)मानपत्र प्रदान केले आहे.

या (अप)मानपत्रात म्हटले आहे, की संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरास ‘खड्ड्यांची राजधानी’ हा बहुमान मिळवून दिल्याबद्दल हे (अप)मानपत्र जाहीरपणे प्रदान करताना आम्हांस अतिशय दु:ख होत आहे. अनेकांना अपंग केल्याबद्दल, अनेकांचे रोजगार बुडवल्याबद्दल, ठेकेदारांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी दिल्याबद्दल, पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची खोटी आश्वासने दिल्याबद्दल, करदात्यांना भरलेल्या करापोटी शारीरिक व्याधींची भेट दिल्याबद्दल, कर्तव्यात कसूर केलेल्यांना अभय दिल्याबद्दल आपले जाहीर कौतुक आहे.

या (अप)मानपत्रासोबतच सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी खड्ड्यांनी आपले आपण दुरुस्त व्हावे यासाठी त्यांची आरतीही सादर केली आहे. ही आरती अशी:

जयदेव जयदेव जय खड्डे देवा !
पालिकेवरती लोभ असाच ठेवा !!
खडीभारीत मुकुट शोभतो बरा!
डांबराची उटी विटांचा चुरा !!
घालता लोटांगण मोडले चरण !
डोळ्यात खुपे हे धुळीचे कण !!
प्रेमे आलिंगता डाॅक्टरचे दर्शन!!!
गॅरेज वाल्यांची तर चैनच चैन !!!!
जयदेव जयदेव जय खड्डे देवा !
पालिकेवरती लोभ असाच ठेवा
!!

Story img Loader