पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादी अजित पवार गटानंतर आता भाजपमधून देखील जगताप कुटुंबातील व्यक्तींना विरोध होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावरून चिंचवड विधानसभा मतदारसंघात राजकारण रंगलं आहे. जगताप कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचं काम करणार नाही. त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी घेतली आहे. तसेच भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी देखील बंडखोरी करण्याचा सूचक इशारा दिला आहे. दोन्ही नेते चिंचवड विधानसभेतून इच्छुक आहेत. ते माघार घेण्यास तयार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप किंवा भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाने दबाव तंत्राचा वापर करत पत्रकार परिषद घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. पक्षातील इच्छुकांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली होती. यानंतर भाजपमधूनच आता जगताप कुटुंबियांना विरोध होत आहे.

हेही वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष मिळेना

आमच्या सोबत २५ ते ३० माजी नगरसेवक असून जगताप कुटुंबियांना त्यांचा विरोध आहे. त्यांना उमेदवारी देऊ नये, उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा माजी नगरसेवक चंद्रकांत नाखाते यांनी दिला आहे. “गेली १५ वर्ष झाले मी मतदार संघात काम करत आहे. मला पक्षाने वेळोवेळी डावललं आहे. त्यामुळे मी आता मागे हटणार नाही. पुन्हा डावललं गेलं तर मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून अखेरचा निर्णय घेईल”, असं म्हणत शत्रुघ्न काटे यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. दोन्ही नेते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. एकूण चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट असेल किंवा भाजपमधूनच जगताप कुटुंबीयांना होत असलेल्या विरोधामुळे महायुतीतून उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही उमेदवारी जगताप कुटुंबातील एका व्यक्तीला मिळाल्यास महायुतीतील घटक पक्ष नेमकं काय निर्णय घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chinchwad assembly constituency bjp leaders shatrughna kate and chandrakant nakhate oppose jagtap family candidate kjp 91 css