पिंपरी : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील दोन मतदारसंघांतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह हद्दपार झाले आहे. महायुतीत अजित पवार यांना एकच पिंपरी मतदारसंघ मिळाला आहे. त्यामुळे चिंचवड आणि भोसरीतून घड्याळ चिन्हांवर निवडणूक लढविणारा उमेदवार नाही.

बारामतीखालोखाल पिंपरी-चिंचवड शहराकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरावर एकछत्री वर्चस्व होते. पिंपरी महापालिकेवर १५ वर्षे राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. पण, राजकीय हवा फिरताच या बालेकिल्ल्याला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून तडे जाऊ लागले. जवळच्या सहकाऱ्यांनी साथ सोडली. अजित पवार यांच्या मुशीत तयार झालेले आमदार (कै.) लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाला रामराम ठोकला. परिणामी, २०१४ मध्ये तिन्ही मतदारसंघांतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. २०१७ मध्ये महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ताही गेली.

हे ही वाचा… दिवाळीतील हवा अन् ध्वनिप्रदूषणावर नजर! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड आणि भोसरीत राष्ट्रवादीला उमेदवारही मिळाले नव्हते. अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची वेळ पक्षावर आली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शहरातील पक्ष संघटना आणि माजी नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत राहिले. परंतु, लोकसभेला राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी भोसरीतील माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले. माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. माजी आमदार विलास लांडे यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरीतील माजी नगरसेवकही आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिल्याने नाराज आहेत; तर चिंचवडमधील माजी नगरसेवक नाना काटे यांनीही बंडखोरी केली आहे.

हे ही वाचा… दिवाळीत पोलिसांची अनोखी भेट; गहाळ झालेले मोबाइल संच नागरिकांना परत

तिन्ही मतदारसंघांतून ‘मशाल’ चिन्ह गायब

महाविकास आघाडीत शहरातील तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळाले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाला एकही मतदारसंघ मिळाला नाही. शहरातील एकाही मतदारसंघात शिवसेनेचे (ठाकरे) मशाल चिन्ह नसणार आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे काम न करण्याचा इशारा दिला आहे.