पिंपरी : आगामी निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला न मिळाल्यास महाविकास आघाडीत ज्या पक्षाला जागा मिळेल, त्या पक्षात प्रवेश करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवडमधील माजी नगरसेवकांनी केला. याबाबत दाेन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ठरावाची प्रत दिली जाणार आहे. त्यामुळे चिंचवडच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताथवडे येथे शुक्रवारी (४ ऑक्टोबर) चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक झाली. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विनोद नढे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, संतोष कोकणे, कैलास बारणे, माजी नगरसेविका उषा काळे यावेळी उपस्थित होते. चिंचवडमध्ये भाजपचा विद्यमान आमदार असल्याने महायुतीच्या ठरलेल्या सूत्रानुसार ही जागा भाजपकडेच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवक, पदाधिका-यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी चिंचवडची जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यास भाजपच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा इशारा चार माजी नगरसेवकांनी दिला हाेता. यानंतरही पक्षाने काेणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे या माजी नगरसेवकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेतली हाेती. त्यानंतर शुक्रवारी या माजी नगरसेवकांनी ताथवडेत बैठक घेतली. निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले नाना काटे यांच्यासह बहुतांश माजी नगरसेवक बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडवरील अजित पवारांची पकड सैल?

लाेकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळून राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी प्रामाणिकपणे काम केले. परंतू, मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीने काम केले नसल्याचा आराेप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. आता विधानसभेलाही तसेच हाेऊ शकते. महापालिका निवडणुकांमध्येही भाजप उमेदवारांचे काम करायचे का, अशा संतप्त भावना उपस्थित माजी नगरसेवक, पदाधिका-यांनी व्यक्त केल्या. यानंतर चिंचवडची जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यास महाविकास आघाडीत प्रवेश करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

हेही वाचा : Bhausaheb Bhoir: “…तर मला लोकं जोड्याने मारतील”; भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली खदखद

आम्ही सर्व जण एकत्र असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चिंचवडच्या जागेची मागणी करणार आहाेत. राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता भाजपचे काम करणार नाही. आमच्यापैकी ज्याला उमेदवारी मिळेल, त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chinchwad former corporators of ncp warns ajit pawar about joining mahavikas aghadi pune print news ggy 03 css