पिंपरी : चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांच्या श्री मंगलमूर्ती पालखीची भाद्रपद यात्रा शनिवारपासून (१६ सप्टेंबर) सुरू होत आहे. २५ सप्टेंबरला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली. पालखी प्रस्थानाच्या निमित्त मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत अश्व अग्रभागी असतील. तसेच पुण्यातील श्री गजलक्ष्मी ढोल पथक सहभागी होणार आहे. शनिवारी दुपारी बारा वाजता पालखी श्री क्षेत्र मोरगावकडे प्रस्थान ठेवणार आहे. श्री मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, चिंचवडगाव स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (लिंकरोड) मार्गे भाटनगर, मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा, लक्ष्मीरस्त्याने जाऊन एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील आतापर्यंत ३० टोळ्यांवर ‘मोक्का’…२४८ गुन्हेगार तुरुंगात!

रविवारी पहाटे साडेचार वाजता पालखी प्रस्थान ठेवेल. कार्यालयातून भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून क-हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल. पालखी सोमवारी सकाळी मंदिरातून शिवरी रासकर मळ्याच्या दिशेने निघेल. श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. २१ सप्टेंबरपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. श्री क्षेत्र जेजुरी, श्री क-हाबाई मंदिर, दिव्य वाटिका आश्रम वडकी या ठिकाणी मुक्काम करीत २५ सप्टेंबरला पालखी पुन्हा चिंचवड येथील मंदिरात येईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chinchwad mangalmurti bhadrpad yatra to be start from saturday 16 september pune print news ggy 03 css
Show comments