पिंपरी : मराठीसह हिंदी आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटक्षेत्रातील आघाडीची सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल जादुई आवाजाची मोहिनी चिंचवडकरांनी अनुभवली. त्यांनी गायलेल्या भक्तिगीते, युगुलगीते, लावणी आणि चित्रपटगीतांची बहारदार गाण्यांची मैफिल गुरुवारी (१९ डिसेंबर) रात्री चिंचवड येथे रंगली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ४६३व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, देवराज डहाळे यांच्या हस्ते बेला शेंडे आणि सहकलाकारांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा : पुणे : तीन घरफोड्यांत साडेसहा लाखाचा ऐवज चोरीला

‘तुज मागतो मी आता’ या गणेश गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बेला शेंडे यांनी गायलेल्या ‘वंदू या गणेशा भावभक्तीच्या शिवारी’, फुलवंती चित्रपटातील ‘शारदास्तवन’, पांडुरंग नामी लागलीसे ध्यास’ या भक्तीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले होते. त्यानंतर बालगंधर्व चित्रपटातील ‘आज मोरे घर पाव ना’, ‘का कळेना कसे कोणत्या क्षणी हरवले मन हे’, ‘वाट ही चालतो खुणावती ही दिशा’, ‘का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो’, ‘गुनगुनावे गीत वाटे’, ‘घुंगराच्या तालामध्ये पिंजण किणकिण वाजते’, ओल्या सांजवेळी ऊन सावलीस बिलगावी’ या गायक सौरव दफ्तरगार यांच्यासोबत गायलेल्या युगुलगीतांना उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. तर ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्याला उपस्थितांनी वन्समोअर दिला. तसेच गायक सौरभ दफ्तरगार यांनी गायलेल्या गुपचूप गुपचूप या चित्रपटातील ‘पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले’, अग बाई अरेच्चा चित्रपटातील ‘मन उधाण वाऱ्याचे’, आणि पिंजरा चित्रपटातील ‘डौल मोराच्या मानाचा ग; डौल मानाचा’ या गाण्यांनाही उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद दिला. यावेळी बेला शेंडे यांनी खास प्रेक्षकांच्या आग्रहाखातर नटरंग चित्रपटातील ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजरी’ ही गौळण आणि ‘राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं नाय’, ‘अप्सरा आली’, तसेच कार्यक्रमाच्या शेवटी ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’ या लावण्या सादर केल्या. या लावण्यांना उपस्थितांनी चक्क नृत्य करत दाद दिली.

हेही वाचा : पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड

या कार्यक्रमासाठी विक्रम भट यांनी तबल्याची साथ दिली, तर पखवाज आणि ढोलकीची साथ ऋतुराज गोरे यांनी दिली. की-बोर्ड साथ अमन सय्यद व मिहीर भडकमकर, इलेक्ट्रॉनिक रिदम अभिजित भदे, गिटार तन्मय पवार व लिजेश शशिधरन यांनी साथसंगत केली. तर साउंडसिस्टीमचे जबाबदारी मोहित नामजोशी यांनी सांभाळली. या कार्यक्रमाचे निवेदन मधुरा गद्रे यांनी अतिशय सुंदर सांभाळली. त्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chinchwad music program of bela shende on the occasion of shriman mahasadhu shri moraya gosavi sanjeevan samadhi sohala pune print news ggy 03 css