चिंचवड: चिंचवड विधानसभेतून महायुतीचे नेते नाना काटे शरद पवार गटात जाण्यासाठी चाचपणी करत असतानाच आता त्यांचे प्रतिस्पर्धी चिंचवड पोट निवडणूक अपक्ष लढलेले राहुल कलाटे देखील शरद पवार गटात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याबाबत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला आहे. जागावाटपावरून राजकारण रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्यासह भाजपमधील शहराध्यक्ष शंकर जगताप, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते आदी इच्छुक उमेदवार आहेत. असं असताना आता महायुती मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाना काटे हे देखील इच्छुक आहेत. ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. काटे हे शरद पवार गटात जाण्यासाठी चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष लढणारे शिवसेना ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभेची तयारी सुरू केली आहे. परंतु, कलाटे यांचा अद्याप पक्ष ठरलेला नाही. चिंचवड पोटनिवडणुकीपासून राहुल कलाटे हे शिवसेना ठाकरे गटापासून दूर आहेत. त्यांना अपक्ष लढावं लागल्याने ते पक्षावर नाराज होते. राहुल कलाटे यांच्यावर पक्षाने कारवाई केलेली नाही, असं स्वतः कलाटे यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये महायुतीत धुसफूस; राष्ट्रवादीचा सर्व मतदारसंघांवर दावा

कलाटे यांना खंबीर साथीची अपेक्षा आहे. ते काही नेत्यांच्या भेटी घेत आहेत. असं देखील त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. नाना काटे यांनी महायुतीची चिंचवड विधानसभेची जागा भाजपला गेल्यास, योग्य तो निर्णय घेऊन अपक्ष किंवा इतर पक्षातून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महायुतीतील या गुंतागुंतीमुळे नाना काटे शरद पवार गटात जाण्यासाठी अनुकूल आहेत. तसं त्यांनी वातावरण तयार केलेलं आहे. ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. परंतु, काटे की कलाटे यांना शरद पवार गटात स्थान मिळतं हे बघावं लागेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chinchwad nana kate and rahul kalate interested to contest assembly election from sharad pawar ncp kjp 91 css